|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » भाजप कोकणातून हद्दपार होणार!

भाजप कोकणातून हद्दपार होणार! 

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची गर्जना

राष्ट्रवादी औषधालासुध्दा शिल्लक राहणार नाही

मंडणगड-देव्हारेत शिवसेनेची जाहीर प्रचार सभा

प्रतिनिधी /मंडणगड

कोणीही कितीही वल्गना केल्या तरी कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तो अभेद्यच राहणार आहे. कोकणात शिवसेनेचा वारू कोणीही रोखू शकणार नाही. तशी ताकद आज कोणाच्यातही नाही. येत्या दहा वर्षात भाजपा कोकणातून हद्दपार होईल, तर राष्ट्रवादी औषधालासुध्दा शिल्लक राहणार नसल्याचा हल्लाबोल पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंगळवारी मंडणगड-देव्हारे येथील शिवसेनेच्या जाहीर सभेत विरोधकांवर केला.

ते पुढे म्हणाले, कोकणचा विकास फक्त शिवसेनाच करु शकते. भूतकाळात येथील माता व भगिनींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली उतरून होणारी पायपीट सेनेने बंद केली. वाडी कोंडवार रस्ते व एसटीचे जाळे निर्माण केले व आताही सेनेच्या माध्यमातून विकासपर्व आणले आहे. शिवसेनेला सोडून गेलेले पूर्वाश्रमींचे सर्वच सेना नेते आपली औकात विसरुन आकाशाकडे पाहून थुंकत असल्याने स्वतःच बरबाद होत आहेत. सेनेस सोडणारे सारेजण काळाच्या ओघात नष्ट झाल्याची व तुरुगांची भाषा करणारे स्वतःच तुरुंगात बसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. तसेच वेळ असतानाच भगव्याच्या छताखाली येत गद्दारीचा शिक्का आपल्या मागे लावून न घेण्याचा सल्लाही कदम यांनी माजी आमदारांना दिला.

पश्चिम महाराष्ट्र सत्ता असताना कोकणवासियांची फसवणूक झाली, पण सत्ता केंद्र बदलल्याने फावडे आपल्याकडे माती कशी खेचते, हे तालुक्यात 700 कोटी रुपयांची विकासकामे आणून सिध्द केल्याचे ते म्हणाले. भाजप व राष्ट्रवादीवर टीका करताना आगामी 10 वर्षात भाजपा आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष कोकणातून नामशेष होणार आहेत. कोकण हे शिवसेनेचे असून ते शिवसेनेकडेच राहणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम आहे.

टेकू लावलेले सरकार कोसळणार

राज्यात शिवसेनेच्या आधाराचा टेकू लावलेले सरकार कोणत्याही क्षणी कोसळून असून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री, तर आपण गृहमंत्री होणार असल्याचे भाकीतही त्यांनी यावेळी वर्तवतानाच या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकवण्यासाठी सर्वानी पाठीशी रहावे, असे आवाहनही त्यानी यावेळी केले.

यावेळी संपर्कप्रमुख विजय कदम, तालुका प्रमुख संतोष गोवळे, आदेश केणे दत्ताजी गुजर, दत्ता गोवळे, संदीप राजपुरे, सुधीर कालेकर, भगवान घाडगे, सपना दिवेकर, स्नेहल सकपाळ, दीपक मालुसरे, दीपक जाधव, प्रेरणा घोसाळकर, अमिता शिंदे, रामदास रेवाळे, सुरेश दळवी, संकेत भोसले, रघुनाथ पोस्टुरे, मुझफ्फर चीपोलकर, दक्षता सापटे, नीलेश गोवळे, दिनेश गायकवाड, शंकर म्हाप्रळकर, संजय शेडगे, सुधीर पागार, राजेश भोवणे, प्रताप घोसाळकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मोहन दळवी यांनी केले

दळवी समर्थकांनी दाखवले काळे झेंडे

मंडणगड पंचायत समिती येथे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचे खंदे समर्थक व शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संतोष घोसाळकर यांनी तालुका दौऱयावर आलेल्या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. पक्षाकडून सातत्याने मिळणाऱया दडपशाहीच्या वागणुकीचा निषेध म्हणून आपण हे पाऊल उचलल्याचे तालुकाप्रमुख घोसाळकर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

Related posts: