|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बांगलादेशवरील चिनी पकड सैल करणार भारत

बांगलादेशवरील चिनी पकड सैल करणार भारत 

पाणबुडय़ांचे प्रशिक्षण देण्याचा होणार निर्णय   शेख हसीना एप्रिलमध्ये भारतात येणार, अनेक करार शक्मय

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

बांगलादेशसोबत संरक्षण संबंध वाढविण्याच्या चीनच्या प्रयत्नांदरम्यान भारत आपली नवी रणनीति तयार करत आहे. चीनने बांगलादेशला काही काळापूर्वी 2 पाणबुडय़ा दिल्या होत्या. भारत बांगलादेशच्या नौसैनिकांना पाणबुडय़ांच्या संचालनाचे प्रशिक्षण देण्याची बाब अंतिम करू शकतो.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या एप्रिल महिन्यात भारतात येणार आहेत. याची तारीख निश्चित करण्यासाठी विदेश सचिव एस. जयशंकर हे 23 फेब्रुवारी रोजी ढाक्यात जातील. विदेश सचिवांच्या दौऱयात संरक्षण सहकार्यावर देखील खूप महत्त्वपूर्ण चर्चेची शक्यता आहे. सूत्रानुसार बांगलादेशच्या नौदलाला पाणबुडय़ांचे प्रशिक्षण देण्यासाठी भारत पुढाकार घेऊ शकतो. भारत  बांगलादेशच्या सैनिकांना दीर्घकाळापासून प्रशिक्षण देत आहे, पाणबुडय़ांच्या प्रशिक्षणावर सरकारी स्तरावर निर्णय झाला तर तो रणनीतिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण असेल.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात ढाका येथे गेले होते. मागील 30 वर्षात बांगलादेशला जाणारे ते पहिले चिनी नेते ठरले. त्यामुळे दोन्ही देशांदरम्यान रणनीतिक सहकार्य भारतासमोरील चिंता म्हणून पाहिले गेले. बांगलादेशला चीनकडून 2 पाणबुडय़ा मिळाल्या होत्या. परंतु येथील नौदलाच्या अधिकाऱयांनी त्या पाणबुडय़ांना आता वापर करण्याजोग्या नसल्याचे म्हटले हेते.

दिग्गज थिंक टँकशी संबंधित राहिलेले डॉ. पी.के. घोष यांनी बांगलादेश पाणबुडय़ा प्राप्त करतोय याची चिंता नाही, तर या पाणबुडय़ा चीनने त्याला दिल्या आहेत हा खरा भारतासाठी चिंतेचा विषय आहे असे म्हटले.

चिनी पाणबुडय़ांचा बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरात हस्तक्षेप वाढतोय. बांगलादेशला सर्वाधिक लष्करी सामग्री चीनकडूनच मिळते.

संबंध वृद्धिंगत..

भारत बांगलादेशसोबत संरक्षणात सहकार्याच्या मोठय़ा व्यवहारासह चीनच्या पावलाची भरपाई करू इच्छितो. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर 30 नोव्हेंबर रोजी बांगलादेशला गेले होते. त्यांनी बांगलादेशच्या लष्कराच्या क्षमता वाढविण्यात सहकार्याचे संकेत दिले होते असे मानले जाते. घोष यांच्यानुसार भारत बांगलादेशला प्रशिक्षण देऊन चीनच्या पावलाची भरपाई करू शकतो. अलिकडच्या काळात अनेक मुद्यांवर भारत आणि बांगलादेश दरम्यान संबंध वृद्धिंगत झाले आहेत, परंतु खूप काही करणे शिल्लक आहे.