|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विधानसभा अधिवेशनाचा निर्णय 27 पर्यंत कळवा

विधानसभा अधिवेशनाचा निर्णय 27 पर्यंत कळवा 

गोवा खंडपीठाचा राज्य सरकारला आदेश

प्रतिनिधी/ पणजी

सर्वोच्च न्यायालयाच्या यापुर्वीच्या निवाडय़ानुसार 6 महिन्याच्या कालावधीत विधानसभेचे अधिवेशन बोलविण्याच्या बाबतीत गोवा सरकार नेमका कोणता निर्णय घेणार आहे? याबाबत 27 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाला कळवावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे.

ऍड. आयरिश रॉड्रिग्स यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. त्यात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी देशातील एका प्रकरणी राज्य सरकारला आदेश दिला होता. दोन अधिवेशनांमधील अंतराचा कालावधी 6 महिन्यांपेक्षा अधिक असू नये, असे म्हणून राज्य सरकारला अधिवेशन घेण्यास सांगितले होते. या निर्णयाचे आता गोव्याने देखील पालन केले पाहिजे, अशी याचना आयरिश रॉड्रिग्ज यांनी केली आहे.

घटनेच्या 174 च्या नियमाचे पालन व्हावे आणि गोवा सरकारला 28 फेब्रुवारीनंतर विधानसभेचे अधिवेशन बोलविण्यास भाग पाडावे, असे याचिकेत म्हटले होते. सदर याचिका न्यायमूर्ती एफ. एम. रईस व न्या. नूतन सरदेसाई यांच्यासमोर सुनावणीस आली असता मंगळवारी न्यायमूर्तीनी गोवा सरकारला या संदर्भात उत्तर देण्यासाठी 27 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे.

गोवा विधानसभेचे अखेरचे अधिवेशन दि. 31 ऑगस्ट 2016 रोजी झाले होते. नियमानुसार 28 फेब्रुवारी रोजी 6 महिने पूर्ण होत असून या कालावधीत गोवा सरकारने विधानसभेचे अधिवेशन बोलाविले नसल्याने 174 च्या कलमाचा भंग होत असल्याने सरकारने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे व कलम 174 अन्वये अधिवेशन बोलविण्यास भाग पाडावे यासाठी याचिकेमध्ये मागणी केली होती.