|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वेदगंगेत पाणी, शेतकरी सुखावला

वेदगंगेत पाणी, शेतकरी सुखावला 

वार्ताहर / निपाणी

वेदगंगा नदी कोरडी, शेतकरी चिंतेत अशा आशयाचे वृत्त तरुण भारतने कोरडे पडलेल्या वेदगंगा पात्राच्या फोटोसह प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत जागृत शेतकऱयांनी प्रशासनाला चक्काजाम करण्याचा इशारा दिला. याची दखल घेताना मंगळवार 14 रोजी वेदगंगा नदीपात्रात काळम्मावाडी धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून सोडण्यात आले. यामुळे कोरडी पडलेली वेदगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. परिणामी शेतकरी सुखावला असून समाधान व्यक्त होत आहे.

निपाणी शहरासह ग्रामीण भागासाठी काळम्मावाडी पाणी करार वरदान ठरला आहे. वेदगंगा बारमाही वाहू लागल्याने परिसरात शेती विकासातून हरितक्रांती घडली आहे. यंदा परिसरात व काळम्मावाडी पाणलोट क्षेत्रात पूरक पाऊस झाल्याने काळम्मावाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. पूर्ण क्षमतेने धरण भरल्याने यंदा बारमाही पाणी उपलब्ध होणार या अपेक्षेने तंबाखू उत्पादक शेतकऱयांनी पर्यायी ऊस लागवडीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. यातून ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.

ऊस क्षेत्रामुळे परिसरात पाण्याची मागणी वाढत आहे. असे असले तरी या महिन्यात नियमित पाणी सोडण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. यातून गेल्या 15 दिवसापासून वेदगंगा नदीपात्र कोरडे पडले होते. कोरडय़ा नदीपात्रामुळे शिवारात डौलाने वाढणारी पिके सुकू लागली होती. यातून शेतकरी चिंताग्रस्त बनला होता. कोरडय़ा नदीपात्राचा लाभ उठवत काही ठिकाणी वाळू माफियांकडून बेकायदा वाळू उपसा सुरु होता.

शेतकऱयांचे पाण्याविना नुकसान

निर्माण झालेली परिस्थिती शेती पिकांसाठी धोक्याची घंटा होतीच. पण त्याचबरोबर शेतकऱयांना आर्थिक नुकसानीला कारण ठरत होती. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत होता. यामुळे शेतकरीवर्गांसह सर्व स्तरातून काळम्मावाडी धरणातून वेदगंगा नदीत पाणी सोडण्याची मागणी होत होती. कोडणी परिसरातील शेतकऱयांनी तर पाणी वेळेत न सोडल्यास राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलनाचा इशाराही दिला होता. अशा इशाऱयाला एक दिवस उलटतो न उलटतो तोच मंगळवारी वेदगंगा नदीत पाणी सोडण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.