|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » भारतीय महिला संघाचा विजयी ‘पंच’

भारतीय महिला संघाचा विजयी ‘पंच’ 

द.आफ्रिकेविरुद्ध 49 धावांनी विजय, मिताली राज सामनावीर

वृत्तसंस्था / कोलंबो

येथे सुरु असलेल्या आयसीसी महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेत भारतीय महिला संघाने आपला विजयी धडाका कायम ठेवताना सलग पाचव्या विजयाची नोंद केली. बुधवारी झालेल्या सुपर सिक्स फेरीतील लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेला 49 धावांनी पराभूत केले. भारताने विजयासाठी ठेवलेल्या 206 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव 156 धावांवर आटोपला. 64 धावांची खेळी साकारणारी भारताची मिताली राज सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.

प्रथम फलंदाजी करणाऱया भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर दीप्ती शर्माला अवघ्या 9 धावा करता आल्या. यानंतर मोना मेश्राम व कर्णधार मितालीने दुसऱया गडय़ासाठी 96 धावांची भागीदारी करत संघाला सावरले. मोनाने 85 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारासह 55 धावा फटकावल्या. कर्णधार मितालीनेही शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 85 चेंडूत 10 चौकारासह 64 धावा केल्या. पण, ही जोडी लागोपाठ बाद झाल्यानंतर भारताचा डाव घसरला. वेदा कृष्णमुर्ती (18), देविका वैद्य (19) व शिखा पांडे (21) यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. यामुळे भारताला निर्धारित 50 षटकांत 8 गडी गमावत 205 धावा करता आल्या. द.आफ्रिकेतर्फे केप व खाकाने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

प्रत्युतरादाखल खेळणाऱया दक्षिण आफ्रिकेला विजयासाठीचे 206 धावांचे आव्हान पेलवले नाही. शिखा पांडे (4/34) व एकता बिश्त (3/22) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर आफ्रिकेचा डाव 46.4 षटकांत 156 धावांवर आटोपला.  आफ्रिकेतर्फे त्रिशा चेट्टीने सर्वाधिक 52 धावा केल्या. मेरजीन केप (29) व कर्णधार निकेर्क (20) धावांचे योगदान दिले. मधल्या फळीतील अन्य फलंदाजानी निराशा केल्यामुळे आफ्रिकेला 49 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाला या विजयासह दोन गुण मिळाले आहेत. 

संक्षिप्त धावफलक : भारत 50 षटकांत 8 बाद 206 (मोना मेश्राम 55, मिताली राज 64, शिखा पांडे 21, केप 2/23, खाका 2/44), दक्षिण आफ्रिका 46.4 षटकांत सर्वबाद 156 (त्रिशा चेट्टी 52, केप 29, निकेर्क 20, शिखा पांडे 4/34, एकता बिश्त 3/22).

मितालीने गाठला 5500 धावांचा गाठला टप्पा

भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजच्या नावे बुधवारी नव्या विक्रमाची नोंद झाली. वनडे क्रिकेटमध्ये 5,500 धावांचा टप्पा गाठणारी मिताली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरी खेळाडू ठरली आहे. द.आफ्रिकेविरुद्ध तिने 64 धावांची खेळी साकारताना 5,500 धावांचा टप्पा पार केला. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंडच्या कार्लोट एडवर्डच्या नावे आहे. एडवर्डने 5,992 धावा केल्या आहेत. यानंतर मितालीचा दुसरा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे, आयसीसी महिला वनडे क्रमवारीत दुसऱया स्थानी झेपदेखील घेतली आहे.