|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » क्रिडा » आयपीएल सलामीची लढत हैदराबादेत, इंदोरचेही ‘पुनरागमन’

आयपीएल सलामीची लढत हैदराबादेत, इंदोरचेही ‘पुनरागमन’ 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेच्या 10 व्या आवृत्तीची रुपरेषा बीसीसीआयने जाहीर केली असून या स्पर्धेतील सलामीची लढत दि. 5 एप्रिल रोजी हैदराबादेत खेळवली जाईल तर याच ठिकाणी दि. 21 मे रोजी जेतेपदाचा फैसला होणार आहे. यंदाची ही स्पर्धा एकंदरीत 47 दिवस चालणार असून प्रत्येक संघ साखळी फेरीत प्रत्येकी 14 सामने खेळणार आहे. विद्यमान विजेते सनरायजर्स हैदराबाद व उपजेते रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर यांच्यात यावेळी सलामीची लढत रंगणार आहे.

गतवर्षी ज्या संघाने स्पर्धा जिंकली, त्या संघाला पुढील वर्षी सलामीची लढत व अंतिम लढतीचे यजमानपद बहाल करण्याची आयपीएलची परंपरा असल्याने यंदा हैदराबादला दोन महत्त्वाच्या लढतींचे यजमानपद मिळाले आहे. यंदा साखळी फेरीचा झंझावात संपन्न झाल्यानंतर दि. 16 व 19 मे रोजी दोन क्वालिफायर सामने तर दि. 17 मे रोजी स्पर्धेतील एकमेव एलिमिनेटर सामना खेळवला जाणार आहे. अर्थात, या तीन लढती कुठे होतील, हे आयोजकांनी तूर्तास जाहीर केलेले नाही. या हंगामात इंदोरचा 2011 नंतर प्रथमच समावेश केला असून येथे यंदा 3 लढती खेळवल्या जाणार आहेत.

किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ घरच्या भूमीतील तीन सामने इंदोरमध्ये खेळणार असून यात दि. 8 एप्रिल रोजी रायजिंग पुणे, दि. 10 एप्रिल रोजी आरसीबीविरुद्ध व दि. 20 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांचे सामने होतील. गुजरात लायन्ससाठी कानपूरमध्ये घरच्या भूमीतील दोन सामने होणार आहेत. यातील पहिली लढत दि. 10 मे रोजी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध तर दुसरी लढत दि. 13 मे रोजी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होईल.

इंदोरला आंतरराष्ट्रीय स्तरावरील खूपच कमी सामन्यांचे यजमानपद लाभले असल्याने यंदा मिळालेली संधी त्यांच्यासाठी मोलाची ठरु शकते. येथील होळकर स्टेडियमवर 2006 मध्ये पहिली वनडे झाल्यानंतर पुढे तब्बल 10 वर्षांनी ऑक्टोबर 2016 मध्ये पहिलीच कसोटी भरवली गेली होती. याच शहरातील आणखी एक आंतरराष्ट्रीय स्टेडियम नेहरु स्टेडियमवर त्यापूर्वी 1983 ते 2001 या कालावधीत एकूण 9 वनडे सामने संपन्न झाले.

त्यानंतर 2011 मध्ये इंदोर येथे आयपीएलचे 2 सामने कोची टस्कर्स केरळसाठी खेळवले गेले. मागील हंगामात नागपूरला पंजाबच्या 3 सामन्यांचे यजमानपद बहाल केले गेले. पण, त्यावेळी दुष्काळावरुन रण माजल्यानंतर ते सर्व सामने मोहालीत हलवण्यात आले होते. यंदा सुटीचे दिवस वगळता आठवडय़ातील काही दिवशी अर्थात सोमवारी व शुक्रवारी सायंकाळी 4 चे सामनेही आयोजित केले जाणार आहेत, असे बीसीसीआयने नमूद केले.