|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » दहा हजारांची लाच घेताना पोलीस हवालदार, पंटर जाळय़ात

दहा हजारांची लाच घेताना पोलीस हवालदार, पंटर जाळय़ात 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

करवीर तालुक्यातील घानवडे ग्रामसेवकाशी निगडीत गुन्हय़ात मदत करतो, असे सांगून 25 हजारांची मागणी करणाऱया आणि 10 हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱया पोलीस हवालदार आणि पंटरला अशा दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पकडले. करवीर पोलीस ठाण्यातील कर्मचारी जावेद गुलाब सय्यद (वय 45) यांच्यासह सावरवाडी येथील त्याचा पंटर शत्रुध्न ज्ञानदेव जाधव याला लाच प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे.

घानवडे येथे तक्रारदाराचे अनुरूप कृषी सेवा केंद्र आहे. या दुकानातून खते, बियाणांची विक्री केली जाते. तक्रारदाराने गावात नवीन घर बांधण्यासाठी ग्रामसेवकाकडून परवानगी, औषध दुकानासाठी लागणारा ना हरकत दाखला फेब्रुवारी 2015 मध्ये घेतला आहे. त्यानंतर त्यांनी बांधकामाला सुरूवात केली. ऑगस्ट 2015 मध्ये ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर घानवडे ग्रामपंचायतीकडून तक्रारदारांना नवीन बांधकाम अवैध असल्याची नोटीस निघाली. तसेच तक्रारदाराला दिलेला ना हरकत दाखला, बांधकाम परवाना, घरफाळा पावती आदी ग्रामसेवकाची बोगस सही, शिक्के वापरून तयार केल्याचा गुन्हा तक्रारदारावर करवीर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या गुन्हय़ात ग्रामसेवकाचा मदतनीस क्लार्क सागर शामराव सावंत हाही आरोपी आहे. याचा तपास शिरोली दुमाला पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार जावेद गुलाब सय्यद यांच्याकडे होता.

करवीर दुमाला पोलीस चौकीत ग्रामसेवकाच्या बोगस सही, शिक्क्याच्या नोंद असलेल्या गुन्हय़ातून तक्रारदाराला बाहेर काढू, असे पोलीस हवालदार जावेद सय्यद याने तक्रारदाराला सांगितले. हा तपास सुरू असून या गुन्हय़ात मदत करतो, त्यासाठी 25 हजार रूपये द्या, अशी मागणी हवालदार सय्यद यांनी तक्रारदाराकडे केली होती. याची तक्रार 13 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

करवीर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार जावेद सय्यदसंदर्भात चौकशी करता त्याने तक्रारदाराकडून गुन्हय़ात मदत करण्यासाठी 10 हजार रूपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हवालदार जावेद सय्यद याच्याविरोधात शिवाजी पेठेतील एका औषध दुकानात सापळा रचला. तेथे सावरवाडी येथील सय्यदचा पंटर शत्रुध्न ज्ञानदेव जाधव याच्याकडून 10 हजार रूपयांची लाच घेताना हवालदार सय्यदला रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी पंटर जाधवलाही ताब्यात घेण्यात आले. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक प्रसाद हसबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक राजेश गवळी, पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील आणि त्यांच्या सहकाऱयांनी केली