|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » क्रांती मोर्चात निपाणीकरांचा हुंकार

क्रांती मोर्चात निपाणीकरांचा हुंकार 

वार्ताहर/ निपाणी

सकल मराठा आणि मराठी भाषिक क्रांती मूक मोर्चाच्या माध्यमातून सीमाप्रश्न तसेच अनेक मागण्यांचा हुंकार घालण्यासाठी बेळगाव येथील क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी सकल मराठा बांधव निपाणीतून गुरुवारी सकाळी मोठय़ा संख्येने रवाना झाले. यामध्ये अधिकतर युवा कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून आला.

सकाळी 7 वाजल्यापासून निपाणी शहरात विविध मार्गांवरून सकल मराठा बांधव बेळगाव मोर्चात सहभागी होण्यासाठी एकत्र जमत होते. यामध्ये ग्रामीण भागातून येणाऱया बांधवांचा मोठा सहभाग होता. यावेळी भगवे फेटे, टी शर्ट आणि भगव्या ध्वजामुळे वातावरण भगवेमय पहावयास मिळाले. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी अबालवृद्धांसह युवक-युवतींचा उत्साह दिसून येत होता. पोलीस प्रशासनाकडून मोर्चासाठी बेळगावकडे जाणाऱया मराठा बांधवांची शहराबाहेरील मार्गावर कसून चौकशी सुरू होती. या चौकशीचा उद्देश पोलिसांनी गुलदस्त्यात ठेवला आहे.

पोलिसांकडून राष्ट्रीय महामार्ग सेवा रस्त्यावर बॅरिकेड्स लावून वाहने थांबवण्यात येत होती. प्रत्येक वाहनाचे चित्रीकरण केले जात होते. त्याचप्रमाणे मोर्चेकऱयांची नावे व वाहनांचे नंबर पोलिसांकडून नोंद करून घेतले जात होते. चौकशीसाठी थांबविण्यात येणाऱया पोलिसांच्या मोहिमेतून स्थानिक वाहनधारकांना मात्र विनाकारण त्रास होत होता.

कोपर्डी येथील घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मराठा क्रांती मूक मोर्चाच्या माध्यमातून सकल मराठा समाज एकवटला आहे. महाराष्ट्रात झालेले सर्वच क्रांती मोर्चे मोठय़ा संख्येच्या सहभागातून यशस्वी झाले आहेत. कोल्हापूर येथील मूक मोर्चात तर सीमाभागातील हजारो सकल मराठा बांधवांनी सहभाग नोंदविला. असे असताना शासनाने मात्र याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे दिसून येते.

आता कर्नाटकात विविध शहरांमध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा क्रांती मूक मोर्चाचे नियोजन केले जात आहे. बेळगावमधील होणारा क्रांती मोर्चा हा निपाणीसाठी अस्मिता मानला जात आहे. या मोर्चामध्ये निपाणीकरांनी सहभाग दर्शवून निपाणीचे बेळगावशी असलेले अतूट नाते दाखवून दिले आहे. निपाणीत गुरुवारचा आठवडी बाजार असतानाही अनेकांनी मोर्चात सहभाग दर्शविला.

संकेश्वरकरांचाही सहभाग

संकेश्वर :  बेळगावमधील मराठा क्रांती मोर्चासाठी संकेश्वर परिसरातील युवक मोठय़ा संख्येने दाखल झाले आहेत. गेल्या आठवडाभरापासून संकेश्वर शहरात याची तयारी सुरू होती. युवक, कार्यकर्ते स्वतःची वाहने घेऊन गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून बेळगावच्या दिशेने रवाना झाले. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संकेश्वर पोलिसांनी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच दुचाकींसह इतर वाहनांची चौकशी करण्यात येत होती. शहरातील सकल मराठा बांधव भगव्या झेंडय़ांसह दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन राष्ट्रीय महामार्गावरून बेळगावकडे जाताना दिसत होते.

Related posts: