|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बसर्गेत म्हाईसाठी आलेल्या दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू

बसर्गेत म्हाईसाठी आलेल्या दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू 

वार्ताहर/ हलकर्णी

बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथे काल बुधवारी म्हाईच्या जेवणासाठी आलेल्या दोन युवकांचा विहिरीत पाय घसरून पडल्याने बुडून अंत झाला. रामू दत्तू केरूडकर (वय 42) व युवराज मारूती पाटील (वय 20) अशी या घटनेत मयत झालेल्या दुर्दैवींची नावे असून दोघेही मूळ घुलेवाडी (ता. चंदगड) येथील ऊस तोडणी कामगार आहेत.

मयत दोघांसह दिलीप पाटील, शिवाजी पाटील, निलाप्पा मरणहोळकर, परशराम असे सहाजण बसर्गे येथे गणेश हासूरकर यांच्या घरी म्हाईच्या जेवणासाठी आले होते. जेवण करून परतत असताना बाळासाहेब टेळी पायवाटेलगत असणाऱया हासूरकर बंधूंच्या विहिरीत तोल जाऊन पडले. ही घटना काल बुधवारी मध्यरात्री घडली. मयत रामू व युवराज हे सर्वात मागे राहिले होते. पायवाटेलगतच ही खोल विहीर आहे. दोघांच्याही डोकीला गंभीर दुखापती झाल्या. दत्तू याचा कान तुटला होता. एकमेकांना सावरण्याच्या नादात हे दोघे विहिरीत पडले असावेत असा अंदाज करण्यात येत आहे. ते जेथून घसरले तेथे चप्पल आढळून आले आहेत. सदर विहीर खोल असून त्यात पाणीही जास्त असल्याने पाण्याचा उपसा करून सकाळी 9 च्या सुमारास एक तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. याबाबत गणेश हासुरकर यांनी हलकर्णी पोलिसात वर्दी दिली. सहाय्यक फौजदार मधुकर पोवार व नारायण देसाई यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

बसर्गेतील दुसरी घटना अन् हळहळ

बसर्गेकर दरवर्षी मोठय़ा उत्साहाने म्हाई साजरी करतात. गणेश हासूरकर गेल्या वर्षभरापासून घुलेवाडी येथील पुंडलिक सुबराव पाटील यांच्याकडे ऊस वाहतुकीचे काम करत होते. या ओळखीतून त्यांनी म्हाईचे निमंत्रण दिले होते. मात्र काळाने युवराज व दत्तू यांच्यावर घाला घातल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत होती. यापूर्वी 2009 साली टोणपी बंधूंच्या विहिरीत अशाच म्हाईच्या जेवणासाठी आलेल्या इंचनाळ गावच्या एकाला जीव गमवावा लागला होता.