|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » रस्ता, बंधारा यशस्वीतेनंतर नंतर ‘जलक्रांती’ होईल!

रस्ता, बंधारा यशस्वीतेनंतर नंतर ‘जलक्रांती’ होईल! 

मालवणदेवबागमधील रस्ता, बंधारा पूर्ण करण्याची धम्मक माझ्यात होती. ग्रामस्थांच्या भक्कम पाठिंब्यामुळे मला यश मिळाले होते. आता देवबागमध्ये खारे पाणी लोकांना पिण्यासाठी मिळत असल्याने त्यांचे आयुष्य घटत आहे. यासाठी कोणत्याही राजकीय पक्षांकडे धोरणात्मक आणि ठोस उपाययोजनांचे व्हिजन दिसत नाही. त्यामुळे मतदारसंघात धोरणात्मक जलक्रांती आणण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरलो आहे. माझ्या मतदारांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचे माझे पहिले कर्तव्य असेल, असे प्रतिपादन वायरी-भूतनाथ मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉ. भरत मणचेकर यांनी केले.

 मी सरपंच झालो, त्याच दिवशी रस्ता आणि समुद्रकिनारी बंधारा बांधण्याचा मी निर्धार केला. देवबाग येथे रस्ता होण्यासाठी अनेक आंदोलने, उपोषणे केली. रस्ता पूर्ण झाला. देवबागकरांचे स्वातंत्र्योत्तर गेल्या 40-42 वर्षांचे स्वप्न साकार झाले. लोकांचा वनवास संपला. एसटीसाठीची पायपीट थांबली. रस्ता पूर्ण होताच येथील जनतेचा विकास झपाटय़ाने व्हायला सुरुवात झाली. याच रस्त्यावरून वाहतूक होऊन समुद्रावर बंधाऱयाचे दगड पडू लागले. पुढील तीन वर्षांत सुमद्राला तटबंदी घालण्याचे धाडसाचे काम….समुद्र धूपप्रतिबंधक बंधारा पूर्ण झाला. गावातील बेरोजगार तरुणांनी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी जीपगाडय़ा, टेम्पो, रिक्षा सुरू करून उदरनिर्वाह सुरू केला. गावात रस्ता झाल्यावर आणखीही डॉक्टर स्कूटरने येऊ लागले. लोकांची त्यामुळे सोय झाली. नाटय़वेडय़ा लोकांची गरज लक्षात घेऊन मी ग्रामपंचायतीचे उत्पन्न केवळ वीस हजार रुपये असूनही व जवाहर रोजगार हमीचा निधी केवळ सत्तर हजार असूनही एक मोठं स्वप्न पाहत, मी पाचशे प्रेक्षक बसतील, असे 4 लाख 30 हजार एस्टिमेंट असलेले मिनी नाटय़गृह ग्रामपंचायतीच्या आवारात सुरू केले. जिल्हा परिषद वायरी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. या पंचक्रोशीतील जनतेचा आणि मच्छीमारांचा हक्काचा माणूस म्हणून मला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे या मतदारसंघातून नक्कीच एका क्रांतीचा उदय होईल, असेही मणचेकर म्हणाले.

 ते पुढे म्हणाले, गेली 30 वर्षे मी माझ्या जन्मगावी देवबाग येथे भरीव सामाजिक कार्य केले केले आहे. मी देवबाग गावात दवाखाना सुरू करून येथील रंजल्या गांजल्या गरीब जनतेच्या दुःखाशी समरस झालो. मुंबईतून आलेला मी माणूस येथे गावात राहून केवळ डॉक्टरकी न करता येथील लोकांची रस्त्यावाचून होणारी कुचंबणा, पावसाळय़ात समुद्र खवळल्यावर उडणारा हाहाकार….अपुऱया विद्युत पुरवठय़ामुळे अंधारात बुडालेले गाव हे दुर्दैवाचे दशावतार पाहिल्यावर व अनुभवल्यावर मी गाव विकासाचा ध्यास घेऊन 1987 मध्ये कै. वामनराव महाडिक यांना मुंबईतून आणून त्यांच्या हस्ते उद्घाटन करून वाजत-गाजत शिवसेना आणली. माझ्या खांद्यावर शाखाप्रमुख पदाचा भार दिला गेला आणि त्या दिवसापासून माझ्या सामाजिक कार्याचा प्रारंभ झाला. माझ्या कामाची अभ्यासपूर्ण पद्धत पाहून गावच्या जनतेने मला भरघोस मतांनी गावाचा सरपंच बनविले. सलग तीन वर्षांचा जवाहर रोजगार निधी वापरून ते पूर्ण करायचा अथवा शासननिधी कमी पडल्यास लोकवर्गणी घेऊन किंवा जिल्हा परिषदेकडील कर्ज घेऊन बांधून पूर्ण करण्याचा माझा निर्धार होता. तत्कालिन जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती परशुराम उपरकर यांच्या निर्दशनास ही बाब आणून दिल्यावर या हॉलचे मूल्यांकन 1 लाख 20 हजार रुपये  केले. तरी सुद्धा हे मूल्यांकन खर्ची झालेल्या रकमेपेक्षा 40 हजार रुपयांनी कमी करण्यात आले. आर्थिक अडचण निर्माण करून या लोकांनी आम्हाला अडचणीत आणून एका भव्य वास्तूचा विनाश केला. तरीही आम्ही खचलो नाही….रितसर न्यायालाची पायरी चढून मी या लोकांना ‘हा सूर्य… हा जयद्रथ!’ दाखवून देण्याचा निर्धार केला…..आणि मग सर्वांच्या सहकार्याने ‘मत्स्यगंधा सांस्कृतिक भवन’ देवबागमध्ये भव्य रुपाने पूर्ण झाले. आजही ते डौलाने उभे आहे. त्याकाळात जसा देवबाग रस्त्यासाठी लढा उभारला, तसाच लढा आता पिण्याच्या पाण्यासाठी उभारायचा आहे. अशावेळी माझ्यासारख्या लढवय्या तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यास तो मी यशस्वीपणे लढेन. अशुद्ध खारे पाणी गेली कित्येक वर्षे येथील जनता पित आहे. या पाण्यामुळेच या किनारपट्टीच्या लोकांचा रक्तदाब वाढतो व त्यामुळेच अवेळी अर्धांगवाताचा झटका येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. म्हणून पाण्यासाठी आर्थिक नियोजन अग्रक्रमाने करणे गरजेचे आहे. त्यासाठी मी क्रांती निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझ्या समवेत पंचायत समितीसाठी सौ. श्वेतांगी मणचेकर या वायरी-भूतनाथ पंचायत समितीसाठी लढत देत आहेत. या लढतीत मतदार आमच्यासोबत राहणार असल्याचा आम्हाला विश्वास आहे, असेही डॉ. मणचेकर यांनी स्पष्ट केले.