|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » क्रिडा » प्रसारमाध्यमांवर सानिया नाराज

प्रसारमाध्यमांवर सानिया नाराज 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने प्रसार माध्यमावर संतप्त प्रक्रिया व्यक्त केली. केंद्रीय अबकारी आणि कस्टम खात्याकडून सानियाला सेवा करासंदर्भात नोटीस बजाविण्यात आली. दरम्यान, प्रसार माध्यमाने या बातमीला अधिक ठळक प्रसिद्धी दिल्याबद्दल सानियाने नाराजी व्यक्त केली.

गेल्या आठवडय़ात केंद्रीय कस्टम आणि अबकारी खात्यातर्फे सानिया मिर्झाला सेवा कर भरण्याबाबत नोटीस बजाविण्यात आली होती. एक कोटी रूपयांचा टॅक्स सानियाने चुकविल्याबद्दल ही कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली होती. प्रसार माध्यमाने या बातमीला ठळक प्रसिद्धी दिल्याने सानिया अधिक संतप्त झाली.

सध्या सुरू असलेल्या कतार खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत सानियाने दुहेरीत उपांत्य फेरी गाठली पण या बातमीला अधिक प्राधान्य देण्याऐवजी कस्टम आणि अबकारी खात्याकडून बजावण्यात आलेल्या नोटिसीच्या बातमीला अधिक महत्त्व दिल्याबद्दल प्रसार माध्यमावर सानियाने जोरदार टीका केली. चांगल्या बातमीपेक्षा नकारात्मक बातमीला अधिक स्थान देण्याची प्रसार माध्यमाची ही मोहीम योग्य नसल्याचे म्हटले आहे.

कतार टेनिस स्पर्धेत सानिया आणि तिची साथीदार स्ट्रायकोव्हा यांनी महिला दुहेरीची उपांत्य फेरी गाठताना कॅनडाची डेब्रोव्हेस्की आणि क्रोएशियाची ज्युरेक यांचा 6-4, 6-3 असा पराभव केला होता. पण त्यानंतर सानिया आणि स्ट्रायकोव्हा यांना उपांत्य फेरीत अमेरिकेची स्पियर्स आणि स्रेबॉटनिक यांच्याकडून हार पत्करावी लागली. तेलंगणा शासनातर्फे प्रशिक्षणासाठी सानियाला एक कोटी रूपयांची रक्कम देण्यात आली होती. पण सानियाच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आल्याने तिला केंद्रीय अबकारी आणि कस्टम खात्यातर्फे कर चुकविल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली असल्याचे समजते.