|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पालिकेच्या लेखी ग्वाहीनंतर उपोषण स्थगित

पालिकेच्या लेखी ग्वाहीनंतर उपोषण स्थगित 

प्रतिनिधी/ निपाणी

गेल्या पाच वर्षापासून निधी असूनही रखडलेले राजा शिवछत्रपती भवनाचे काम सुरु व्हावे यासाठी 19 पासून शिवप्रेमींसह पालिकेसमोर उपोषण करण्यात येणार होते. मात्र नुकतेच स्थगित असलेले काम सुरु करण्यात आले आहे. तसेच आपल्या मागणीप्रमाणे सदर काम मूळ आरखडय़ाप्रमाणे करण्यात येईल व भवनाच्या पूर्वदर्शनी बाजूला कोणत्याही प्रकारचे गाळे अथवा अन्य बांधकाम होणार नाही, अशी लेखी ग्वाही पालिकेतर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे 19 पासून होणारे उपोषण स्थगित करत आहोत, अशी माहिती नगरसेवक प्रविण भाटले-सडोलकर यांनी दिली.

येथील ज्येष्ठ विचारवंत डॉ. अच्युत माने यांच्या घरी आयोजित बैठकीत ते बोलत होते. भाटले पुढे म्हणाले, सध्या नगरपालिकेकडून लोकांचा अनुदानासाठी जी छळवणूक होत आहे, ती पाहवत नाही. आपल्याला नगरपालिकेत कोणतेही स्वारस्य नसून केवळ राजा शिवछत्रपती भवन पूर्ण व्हावे यासाठी आपण पदावर आहोत. गेल्या पाच वर्षापासून रखडलेले भवनाचे काम 6 महिन्यात पूर्ण करतो. असे नगराध्यक्षांनी सांगितले. ही अभिनंदनीय बाब आहे. राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवन हे श्रेयवादाचा भाग नाही तर यामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. स्थगित काम पूर्ण व्हावे यासाठी सह्यांची मोहीम राबवली होती. त्याला शिवप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आठवडय़ातच दहा हजार स्वाक्षऱया केल्या.

तसेच सकल मराठा समाज, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह मराठी भाषिक व आजी-माजी लोकप्रतिनिधी सर्व समाजातील नागरिकांनी चांगले पाठबळ दिले. भवन कामाचा प्रश्न हा सन्मानाने मिटला असल्याने उपोषण स्थगित करीत आहोत. असे असले तरी काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणार आहोत, असे सांगितले. बैठकीस प्रा. डॉ. अच्युत माने, नगरसेवक राज पठाण, झाकीर कादरी, विजयराजे देसाई सरकार, हरीष तारळे, शिवसेना शहरप्रमुख विशाल हत्तरगी, राजाराम पाटील, अमित पाटील, विठ्ठल वाघमोडे, राहूल भाटले, उत्तम कामते, महावीर सरमगदूम, टी. टी. सनदी, विजय गोसावी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.