|Friday, July 19, 2019
You are here: Home » मनोरंजन » एकच निर्माता अन् 12 चित्रपट एकत्र प्रदर्शित

एकच निर्माता अन् 12 चित्रपट एकत्र प्रदर्शित 

काहीतरी वेगळी कामगिरी करून रेकॉर्ड बुकमध्ये नाव नोंदल्याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला सापडतात. जसं की, वस्तूंचा संग्रह, गिर्यारोहण… मात्र निर्माते पप्पू तथा सदानंद लाड एका वेगळय़ाच विक्रमासाठी सज्ज आहेत. त्यांनी निर्मिती केलेले 12 चित्रपट एकाच दिवशी, 24 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. आजवर अशी कामगिरी कुठेही झालेली नाही. लाड यांच्या 55 व्या वाढदिवसाच्या औचित्याने हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.

पप्पू लाड यांनी आतापर्यंत सुपारी, बाप माणूस, अण्णा लय भारी इत्यादी चित्रपटांसोबत अनेक म्युझिक अल्बम्सची निर्मिती केली आहे. लाड यांच्या एल. जी. प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या आणि अंकुर मुव्हीज प्रस्तुत 8 मराठी, 3 भोजपुरी आणि एक हिंदी चित्रपटांचा त्यात समावेश आहे. कुंभारवाडा डोंगरी, लाडाची चिंगी, स्वामी, माझ्या नवऱयाची गर्लफ्रेंड, एक कटिंग चाय (दिग्दर्शक : जय तारी), धुरपी (दिग्दर्शक : शशिकांत तुपे), शू… तो आलाय (दिग्दर्शक : बाळासाहेब गोरे), देहांत (दिग्दर्शक : भगवानदास), मनातल्या उन्हात (दिग्दर्शक : विशाल सातव) हे मराठी चित्रपट, मोहब्बत कि जंग (दिग्दर्शक कामेश्वर सिंग), प्रेम की गंगा (दिग्दर्शक नकुल प्रसाद), खून की पुकार (दिग्दर्शक नकुल प्रसाद) हे भोजपुरी चित्रपट आणि यही है जिंदगी (दिग्दर्शक जय तारी) या हिंदी चित्रपटाचा समावेश आहे. याशिवाय ‘देहांत’ या चित्रपटाची निर्मितीची प्रक्रिया सुरू असून, तो या वर्षअखेरीला पूर्ण होणार आहे. या चित्रपटाची झलक याच दिवशी दाखविली जाणार आहे.

सदानंद लाड गिरगाव ते कोल्हापूर परिसरात सुपरिचित आहेत. त्यांचा मित्रपरिवार सर्वत्र विस्तारलेला आहे. ‘आजवर आयुष्यात खूप मोठय़ा व्यक्तींचा सहवास मला लाभला. या सर्वांमुळे आयुष्य अधिक समफद्ध झालं. माझे राजकीय गुरू प्रेमकुमार शर्मा आणि ज्येष्ठ बंधू आनंद लाड यांच्या अर्थपूर्ण मार्गदर्शनामुळेच माझं जीवन खऱया अर्थाने विकसित झालं. आयुष्य हे छान छान गोष्टी करण्यासाठी असतं असं मी मानतो. त्यातल्या काही गोष्टी साध्य झाल्या तरी समाधान लाभतं. माझा मुलगा अंकुरही आता माझं काम पुढे नेत आहे, असं निर्माते सदानंद लाड यांनी सांगितले. एकाच दिवशी 12 चित्रपट प्रदर्शित करण्याच्या कल्पनेविषयी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डशी संपर्क साधला आहे. त्यांच्याकडून प्रतिसादाची प्रतीक्षा आहे, असे सहनिर्माते अंकुर लाड म्हणाले.