|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्नमध्ये सचिन नाईक यांच्या चित्राचे प्रदर्शन

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्नमध्ये सचिन नाईक यांच्या चित्राचे प्रदर्शन 

वार्ताहर/ मडकई

पारपतीवाडा बांदोडा फोंडा येथील सुप्रसिध्द चित्रकार सचिन धनंजय नाईक यांनी चित्रीत केलेल्या चित्राची निवड ललित कला अकादमीने केली असून, बेंगळूर येथे प्रदर्शीत होणाऱया नॅशनल गॅलरी ऑफ मॉडनमध्ये त्यांचे हे चित्र प्रदर्शीत करण्यात येणार आहे. संपूर्ण भारतामधून एकूण 6000 चित्रांचे अर्ज आले होते. त्यातील फक्त 111 चित्रांची निवड करण्यात आली असून गोव्यातील एकमेव चित्रकार सचिन नाईक यांची प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.

 सचिन नाईक यांची गोवा राज्य तसेच देश व विदेशातही चित्रांची प्रदर्शने भरविण्यात आलेली आहे. कितीतरी देश-विदेशातील नागरिकांनी त्यांची चित्रे विकत घेतलेली आहे. सचिन यांनी गोवा कला महाविद्यालयातून पेटिंगची पदवी तसेच फाईन आर्टचे पदव्युत्तर शिक्षण हैद्राबाद येथील सरोजीनी नायडू युनिर्व्हसीटीतून घेतलेले आहे. सध्या ते मडगांवच्या भाटीकर मोडेल स्कूलमध्ये कला शिक्षक म्हणून काम करत आहे.

 त्यांनी चित्रीत केलेले हे चित्र पंधराव्या शतकातील आहे. हा वुडकट आहे. याचा आकार 4 ƒ6 फूट असा आहे. चित्रातील ही परिस्थिती गोव्यात होती. हे चित्र सचिन धनंजय नाईक यांनी 2016 काढले होते. पंधराव्या शतकात गोव्यामध्ये गुलामांचा व्यापार चालत असे. चित्रात या गुलाम लोकांचे भावविश्व वर्णित आहे. वेगवेगळय़ा देशातून अनेक गरीब माणसे बोटीत कोंबून गोव्यात आणली जायची. गोव्यामध्ये वेगवेगळय़ा ठिकाणी व्यापार भरत असे. तरुण मुली, म्हाताऱया बायका, मुले, तरुण पुरुष यांची किंमत त्यांच्या उपयुक्ततेनुसार ठरविली जात असे. व्यापार चालू असताना त्या माणसांचे भावविश्व चित्रात दिसते. तो संपूर्ण मानवसमूह भेदलेल्या अवस्थेत आहे. भविष्यात होणारी आई मूल, नवरा बायको, भाऊ, बहीण यांची ताटातूट त्यांच्या चेहऱयावर स्पष्ट दिसत आहे. मुलाला स्तनपान करणारी आई, ती मुलाला शेवटचे स्तनपान करीत आहे. पुढे त्याला मुलाला स्तनपान करणे शक्य होईल का? हे प्रश्नचिन्ह तिच्यासमोर आवासून उभे आहे.

बोटीमधून प्रवास करताना त्यांना जनावरांप्रमाणे प्रवास करावा लागतो. प्रातविधी व भोजन एकाच ठिकाणी करावे लागते. बायकांना वेगळी व्यवस्था नाही. त्यावेळी वेगवेगळे रोग होऊन माणसे दगायची. विक्री झाल्यानंतर सगळे कुटुंब वेगळे व्हायचे ते कायमचे. त्यांची पुन्हा भेट होत नसे. या चित्रात एका कुटुंबातील कर्ता पुरुष हताश आहे. भविष्याची आठवण करून भेदरलेला आहे. त्याच्या भोवती अन्यायाच्या, अत्याचाराच्या बेडय़ा ठोकल्या आहेत. माणसे त्याच ठिकाणी निर्लज्जपणे आपले सर्व नैसर्गिक व्यवहार एकाच ठिकाणी करत आहेत. गरीबीमुळे ही माणसे विवस्त्र आहेत. चित्र पाहणारे रसिक हे चित्र पाहताना त्याठिकाणी थबकतातच. भावनाप्रदान असलेल्या या चित्राचे कौतूक बांदोडय़ातून तसेच त्यांच्या मित्र परिवाराकडून होत आहे.