|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारत-रवांडा यांच्यात 3 करारांवर स्वाक्षऱया

भारत-रवांडा यांच्यात 3 करारांवर स्वाक्षऱया 

वृत्तसंस्था / किगाली

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या रवांडा दौऱयादरम्यान दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंधांना बळकटी प्रदान करण्यासाठी भारत-रवांडा यांच्यात 3 करारांवर स्वाक्षऱया झाल्या. दोन्ही देशांनी संशोधन, उड्डाण क्षेत्र तसेच व्हिसाविषयक तीन सहमती पत्रांवर स्वाक्षरी केली.

संशोधनाच्या क्षेत्रात दोन्ही देश किगालीमध्ये एक उद्योजकता विकास केंद्राची स्थापना करतील. तर उड्डाण क्षेत्रात रवांडा एअर आगामी काही महिन्यांमध्ये भारतासाठी सेवा सुरू करणार आहे. दोन्ही देश राजनैतिक तसेच अधिकृत पासपोर्टधारकांना व्हिसाकरता सवलती देणार आहेत.

या करारांमुळे आर्थिक तसेच व्यापारी संबंधांना प्रोत्साहन मिळेल. रवांडा आणि भारत यांच्यात 54 वर्षांचे महत्त्वपूर्ण द्विपक्षीय संबंध आहेत आणि आम्ही हे संबंध मजबूत बनविण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे रवांडाचे पंतप्रधान अनस्तासे मुरेकेजी यांनी म्हटले. उपराष्ट्रपती अन्सारी हे रवांडा आणि युगांडाच्या 5 दिवसीय दौऱयावर आहेत. अंसारी यांच्यासोबत अधिकाऱयांचे 27 सदस्यीय शिष्टमंडळ देखील गेले आहे. भारताने मागील काही काळापासून आफ्रीका खंडावर विशेष भर दिला आहे. यानुसार पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी या खंडातील अनेक देशांना भेटी दिल्या आहेत.