|Thursday, June 27, 2019
You are here: Home » क्रिडा » पुण्यात टीम इंडियाचा कसून सराव

पुण्यात टीम इंडियाचा कसून सराव 

पुणे / प्रतिनिधी

पुण्यात गहुंजे स्टेडियमवर 23 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने सोमवारी कसून सराव केला. प्रशिक्षक अनिल कुंबळे, कर्णधार विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली अजिंक्य रहाणे, मुरली विजयसह सर्व संघाने अडीच ते तीन तास आपला घाम गाळला.

या सराव सत्राअंतर्गत गहुंजे स्टेडियमवर नेटमध्ये चेतेश्वर पुजारा, के. एल. राहुल यांनीही कसून फलंदाजी केली. तर आर अश्वीन, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, रविंद्र जडेजा यांनीही गोलंदाजीचा सराव केला.

महेंद्रसिंग धोनीने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहलीच्या अंगावर कर्णधारपदाची जबाबदारी आहे. विराट आणि भारतीय संघाने 2016 चे वर्ष चांगलेच गाजवले आणि कसोटी क्रमवारीत टीम इंडियाला प्रथम क्रमांकावर नेले. नुकत्याच पार पडलेल्या इंग्लड विरूद्धच्या मालिकेतदेखील भारताने इंग्लडला 4-0 अशी धूळ चारली. त्यानंतर बांग्लादेश विरूद्ध झालेल्या एकमेव सामन्यातदेखील भारताने बांग्लादेशचा सहज पराभव केला. नवीन वर्षाच्या सुरूवातील भारताने आपली विजयाची घौडदौड कायम ठेवली आहे.

आता भारतासमोर स्टिव्ह स्मिथच्या बलाढय़ ऑस्ट्रेलिया संघाचे आव्हान असणार आहे. भारतात येण्याआधी भारतीय वातावरणाला येथील फिरकी खेळपट्टय़ांना जुळवून घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाने दुबईमध्ये कॅम्प घेतला. त्यानंतर मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियमवर मुंबई विरूद्ध सराव सामना खेळला. ऑस्ट्रेलियाने भारताच्या दौऱयाकरिता इंग्लडचा फिरकी गोलंदाज मोन्टी पॅनेसरला गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून निमंत्रण दिले आहे. भारताला भारतात धूळ चारण्यासाठी ऑस्ट्रेलियाने पूर्ण तयारी केली आहे. भारतीय फिरकीचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्णपणे सज्ज झाला आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या होणारी बॉर्डर-गावसकर करंडकासाठीची मालिका चुरशीची होणार हे नक्की आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघ कसून सराव करताना दिसत आहे. आज प्रशिक्षक कुंबळे यांनी संघातील खेळाडूंना महत्त्वाच्या टिप्स दिल्या. लढत ऑस्ट्रेलियाशी असल्याने आपला खेळ उंचावण्याबरोबरच मनोधैर्यही कसे बळकट राहील, यावर खेळाडूंना लक्ष केंद्रित करण्याबाबत कुंबळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच स्लेजिंगचा शांत डोक्याने कसा सामना करायचा, याचेही धडे दिले जात आहेत.