|Saturday, May 25, 2019
You are here: Home » क्रिडा » द्रोणावली हरिका उपांत्य फेरीत

द्रोणावली हरिका उपांत्य फेरीत 

वृत्तसंस्था /तेहरान :

भारताची ग्रँडमास्टर द्रोणावली हरिकाने पुन्हा एकदा रॅपिड टायब्रेकमध्ये शानदार जॉर्जियाच्या नॅना झॅग्नाईझवर विजय मिळवित येथे सुरू असलेल्या महिलांच्या फिडे विश्व बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सलग तिसऱयांदा स्थान मिळविले.

नियमित डाव 1-1 असे बरोबरीत राहिल्यानंतर रॅपिड डावात हरिकाने पुन्हा एकदा आपला तांत्रिक खेळाचा दर्जा दाखवून देत पहिला डाव जिंकला तर दुसरा डाव अनिर्णीत राखत ही लढत 1-1 व 1.5-0.5 अशी जिंकून शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. उपांत्य फेरीत तिची लढत चीनच्या टॅन झाँगयीशी होईल. उपांत्यपूर्व फेरीतील अन्य तीन लढतींचे निकाल नियमित डावांतच लागले होते. फक्त हरिकाची लढत टायब्रेकरपर्यंत लांबली होती. हरिकाने नियमित फेरीतील पहिला डाव जिंकून आघाडी घेतली होती. पण परतीच्या डावात तिला नॅनाकडून पराभव स्वीकारावा लागल्याने टायब्रेकरचा अवलंब करावा लागला. आणि रॅपिड प्रकाराची तिला खूप आवड असल्याचे पुन्हा एकदा दाखवून देत विजय साकार केला. या स्पर्धेत सलग चौथ्या लढतीत तिने टायब्रेकरमध्ये विजय मिळविला आहे.

या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत तिने बांगलादेशच्या शमिमा अक्तर लिझाला टायब्रेकरमध्ये हरविल्यानंतर कझाकच्या दिनारा एस.वरही टायब्रेकमध्येच विजय मिळविला. त्यानंतर जॉर्जियाच्या सोपिको गुरामश्विलीवरही टायब्रेकरमध्ये मात करून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी हरिकाला झाँगयीवर मात करणे आवश्यक असून तसे झाल्यास नॉकआऊट विश्व महिला बुद्धिबळ स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ती पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरणार आहे. दुसरी उपांत्य लढत रशियाची अलेक्झांड्रा कोस्टेनियुक व युक्रेनची ऍना म्युझीच्युक यांच्यात होणार आहे.

Related posts: