|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तासगाव पंचायत समितीत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता

तासगाव पंचायत समितीत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता 

प्रतिनिधी /तासगाव :

तासगाव तालुका पंचायत समिती निवडणुकीत बारा पंचायत समिती मतदार संघापैकी सात पंचायत समिती मतदार संघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी बाजी मारली त्यामुळे तासगाव पंचायत समिती पुन्हा राष्ट्रवादीचीच सत्ता येणार असल्याचे  स्पष्ट झाले आहे. तर सभापती पदी राष्ट्रवादीच्याच महिला उमेदवारांची वर्णी लागणार हे ही स्पष्ट झाले आहे. तर पाच पंचायत समिती मतदार संघात भाजप व भाजप पुरस्कृत पाच उमेदवारांनी बाजी मारली आहे. विजयी निकाल समजताच समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.

59 उमेदवारांसाठी, 1 लाख 21हजार 674 मतदान –

तासगाव तालुक्यातील सहा जिल्हा परिषद मतदार संघातील सहा सदस्य निवडीसाठी एकूण 28 उमेदवार निवडणूक रिंगणात होते तर बारा पंचायत समिती मतदार संघातील बारा सदस्य निवडीसाठी 31 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या सर्व उमेदवारांना मंगळवारी तालुक्यातील 72 गावातील 1 लाख 21हजार 674 मतदारांनी मतदान केले होते. त्यानंतर यानिवडणुकीत बाजी कोणाची ते विजयी अठरा उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

   25 टेबलवर मतमोजणी.

या मतदान प्रक्रियेनंतर गुरूवारी तासगाव तहसील कार्यालयातील बहुउद्देशीय हॉल येथे निवडणूक निर्णंय अधिकारी डॉ.विकास खरात व सहाय्यक निवडणूक निर्णय आधिकारी सुनिल ढाले यांच्या नेतृत्वाखाली तसेच गटविकास अधिकारी अरूण जाधव, मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्यासह सुमारे 100 कर्मचाऱयांच्या मदतीने 25 टेबल वर या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया पार पडली आणि लागून राहिलेली विजयी उमेदवाराची प्रतिक्षा संपली.