|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » युवा साहित्य व नाटय़संमेलनाचा आज शुभारंभ

युवा साहित्य व नाटय़संमेलनाचा आज शुभारंभ 

रत्नागिरीत भरणार युवा साहित्यिक, कलावंतांचा मेळा

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरीत 25 व 26 फेब्रुवारी रोजी माळनाका-थिबा पॅलेस रोड येथील जयेश मंगल कार्यालयामध्ये युवा साहित्य व नाटय़ संमेलन रंगणार आहे. मराठी साहित्य परिषद-पुणे आणि अखिल भारतीय नाटय़ परिषद-शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाच्यानिमित्ताने रत्नागिरीत युवा साहित्यिक व नाटय़ कलावंतांचा मेळा जमणार आहे. स्वागताध्यक्ष किरण सामंत, संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध कवी संदीप खरे यांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते होणार आहे.

संमेलनाचा शुभारंभ 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजता जयेश मंगल कार्यालयामध्ये होणार आहे. शुभारंभाला खल्वायन नाटय़संस्थेचे कलावंत नांदी सादर करणार आहेत. त्यानंतर गंगाधर गोविंद पटवर्धन हायस्कूलचे विद्यार्थी मराठी अभिमान गीत व स्वातंत्र्यवीर सावरकर गीत सादर करणार आहेत. यावेळी व्यासपिठावर अ.भा. नाटय़संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रसिद्ध अभिनेते जयंत सावरकर, म.सा.प.चे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, विभागीय साहित्य संमेलन निमंत्रक पद्माकर कुलकर्णी, सहनिमंत्रक राजन लाखे, विभागीय कार्यवाह प्रा. तानसेन जगताप, विनोद कुलकर्णी, कोकण प्रतिनिधी प्रकाश देशपांडे, मसाप शाखाध्यक्ष डॉ. सुभाष देव, निमंत्रक अनिल दांडेकर, नाटय़ परिषद-रत्नागिरी कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांची उपस्थिती असणार आहे.

उद्घाटनानंतर 25 फेबुवारी रोजी 6.45 ते 7 वा. अभिनेते जयंत सावरकर, नाटय़लेखक गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते स्थानिक रंगभूमींचे सत्कार, 7 ते 8 वा. आसावरी शेटय़े त्यांच्या कवितांवर आधारीत रंगमंचीय आविष्कार, 8 ते 9 वा. चतुरंग, गणेशगुळे निर्मित ‘पुरूषार्थ’ एकांकिका सादर होणार आहे. दुसऱया दिवशी

26 रोजी सकाळी वस्त्रहरणच्या गमतीजमती कार्यक्रमांतर्गत नाटय़लेखक गंगाराम गवाणकर गमतीजमती सांगणार आहेत. 10.30 ते 11 वाजेपर्यंत स्थानिक साहित्यिक व रंगकर्मींचे सत्कार, 11 ते 12 वा. संमेलनाध्यक्ष संमेलनाध्यक्ष संदीप खरे यांची मुलाखत आणि कवितावाचन, 12.15 ते 1 वा. परिसंवाद आम्ही काय वाचतो आणि का वाचतो?, परिसंवादात वेदवती मसुरकर, वसुमती करंदिकर, विनीता मयेकर आणि ओंकार मुळे सहभागी होणार आहेत. 2 ते 3 वा. निमंत्रित युवा कवींचे काव्यवाचन होणार आहे. यामध्ये विजय बिळूर, विजय सुतार, सायली पिलणकर, डॉ. अमेय गोखले, ऋतुजा कुलकर्णी, गौरी सावंत, शर्दल रानडे यांचा सहभाग आहे. याचे सूत्रसंचालन ज्योती अवसरे-मुळ्ये करणार आहेत.

3 ते 4.15 वा.नाटय़संमेलनाचे नियोजित अध्यक्ष जयंत सावरकर, गंगाराम गवाणकर यांचा सत्कार, मनोज कोल्हटकर यांना रत्नभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणर आहे. यानंतर समारोपाचा कार्यक्रमाने संमेलनाची सांगता होणार आहे. रत्नागिरीतील युवावर्गामध्ये साहित्य व नाटय़ चळवळ अधिक रूजावी या हेतुने आयोजित या साहित्य व नाटय़संमेलनाला युवावर्गासह साहित्य व नाटय़प्रेमींनी आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष समीर इंदुलकर व मसापचे अनिल दांडेकर यांनी केले आहे.

Related posts: