|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कुपवाडच्या बैठकीत पोलीस अधिकाऱयांचा निषेध

कुपवाडच्या बैठकीत पोलीस अधिकाऱयांचा निषेध 

कुपवाड / वार्ताहर

कुपवाडमध्ये हजरत लाडले मशायक यांच्या ऊरुसाच्या मुख्य दिवशी रात्री धार्मिक कार्यक्रम सुरु असताना कुपवाडच्या पोलीस अधिकाऱयांनी उरुसातील स्टॉलधारकांना मारहाण केल्याने कुपवाडकरांच्या भावना दुखावल्या आहेत. पोलीस जनतेचे रक्षक आहेत, भक्षक नाहीत. पोलिसांची अन्यायी हुकूमशाही चालणार नाही, असा इशारा देत शहरातील हिंदु-मुस्लिम बांधवांनी शुक्रवारच्या बैठकीत पोलीस अधिकाऱयांचा जाहीर निषेध व्यक्त केला.

 कुपवाडच्या पोलीस अधिकाऱयांनी उरुसातील स्टॉलधारकांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी सकाळी कुपवाडच्या दर्ग्यात हिंदु-मुस्लीम बांधव व सर्वपक्षीय पदाधिकाऱयांची बैठक पार पडली. बैठकीस माजी आमदार शरद पाटील, नगरसेवक गजानन मगदुम, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, माजी उपमहापौर मोहन जाधव, अमोल पाटील, महादेव मगदुम, संतोष माने, राजेद पवार, विजय खोत, आशुतोष धोतरे, दादा पाटील, शौकत मुजावर उपस्थित होते. प्रारंभी दर्गा सरपंच रफीक मुजावर यांनी स्वागत करुन पोलीस अधिकाऱयांनी केलेल्या मारहाणी संदर्भात माहिती दिली. 

 कुपवाडकरांचे ग्रामदैवत हजरत लाडले मशायक यांचा उरुस सालाबादप्रमाणें गेल्या 681 वर्षापासुन भरविला जातो. कमिटीच्या वतीने उरसाचे योग्य नियोजन केले जाते. आतापर्यंत उरुसात कधीही अनुचित प्रकार घडला नाही. परंतु, शांततेत चालणाऱया उरुसात पोलीस अधिकाऱयांनी येवुन स्टॉलधारकांना मारहाण केल्याचा प्रकार निंदणीय आहे, असा आरोप करुन सर्वांनी बैठकीत निषेध व्यक्त केला. कुपवाड शहरात वाढत्या चोऱया, गुन्हेगारीवर वचक ठेवण्यात पोलिसांना जमत नाही. मटक्यांसह अनेक अवैध धंदे चालतात, मग स्पिकर आणि उरुस का चालत नाही? असा सवाल करण्यात आला. यावेळी अनेकांनी पोलिसांच्या चुकीच्या कारभाराचा पाढा वाचला. शांतताप्रिय शहरात यापुढे पोलिसांची हुकूमशाही चालु देणार नाही, असा इशारा कुपवाडकरांनी दिला. बैठकीस कुपवाडमधील नागरीक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

पोलीसप्रमुखांकडे तक्रार-चौकशीचे आदेश      

 बैठकीनंतर प्रा.शरद पाटील, नगरसेवक गजानन मगदुम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांची भेट घेवुन निरीक्षक अशोक भवड यांच्या अन्यायी कारभाराविरोधात तक्रार केली. अधिकाऱयांना निलंबीत करुन बदली करावी, अशी मागणी केली. यावेळी पोलीसप्रमुखांनी तक्रारीची गांभिर्याने दखल घेवुन उपअधिक्षक दिपाली काळे यांना चौकशीचे आदेश देवुन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. येत्या सात दिवसांत कारवाई न झाल्यास कुपवाड बंद ठेवुन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला.