|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कुणकेश्वरचरणी उसळला शिवभक्तीचा सागर

कुणकेश्वरचरणी उसळला शिवभक्तीचा सागर 

देवगड : महाशिवरात्रीनिमित्त श्रीदेव कुणकेश्वराच्या दर्शनासाठी शुक्रवारी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली. श्रीदेव कुणकेश्वराच्या चरणाशी लीन होण्यासाठी भक्तांचा महासागरच जणू या तीर्थक्षेत्री लोटला आहे. सलग तीन दिवस महाशिवरात्रीचा उत्सव होणार असून यासाठी देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे. पहिली शासकीय पूजा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आपल्या मातोश्रीसमवेत व आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते पहाटे करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. भाविकांना दर्शन वेळेत मिळण्यासाठी खास व्यवस्था देवस्थान ट्रस्टने केली आहे. रविवारी अमावस्यादिवशी तीर्थस्नानाचा योग असल्याने शनिवारी गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी वातावरणात उष्मा जास्त असल्यामुळे सायंकाळपर्यंत भाविकांची वर्दळ कमी होती. मात्र, सायंकाळनंतर कुणकेश्वर यात्रेमध्ये भाविकांनी अलोट गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. यावर्षी ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने संपूर्ण यात्रेचे चित्रीकरण एलईडी स्क्रिनच्या माध्यमातून प्रसारीत केले जात आहे. दिवसभरात राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी दर्शन घेतले. पहाटे श्रीदेव कुणकेश्वराची पहिली विधीवत पूजा, आरती, महाआरती झाल्यानंतर जिल्हाधिकारी चौधरी व आमदार राणे यांनी पूजा केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, प्रांताधिकारी नीता शिंदे, तहसीलदार वनिता पाटील, कणकवलीच्या तहसीलदार श्रीमती माने, देवगडचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुंबई उपजिल्हाधिकारी डॉ. श्याम घोलप यांनाही पूजेचा मान मिळाला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक नाणेरकर व पदाधिकारी तसेच कुणकेश्वर सरपंच नयना आचरेकर, उपसरपंच रामानंद वाळके, श्रीदेव कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष प्रकाश वाळके व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

भाविकांची अलोट गर्दी

शुक्रवारी पहाटेपासूनच रांगेतून भाविकांना दर्शन देण्यात आले. पहाटेपासूनच एसटी महामंडळाच्यावतीने गावोगावी बसफेऱयांची व्यवस्था करण्यात आली होती. दुकाने मांडण्याचे नियोजन ग्रामपंचायत विभागाकडून करण्यात आले आहे. कोणतीही अनूचित घटना घडू नये, याची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. समुद्रकिनारीही भाविकांनी सायंकाळनंतर मोठी गर्दी केली असून काही भाविकांनी समुद्रस्नानाचा आनंदही लुटला. समुद्र किनारी यावर्षी करमणुकीची विविध साधने उपलब्ध करण्यात आली आहेत. उंटसफारीचे खास आकर्षक किनाऱयावर आहे. तसेच बाजारपेठेत झुला व करमणुकीचे खेळ मांडण्यात आले आहेत. विविध आकर्षक वस्तूंची दुकाने बाजारपेठेत मांडलेली दिसत आहेत. समुद्रात स्नान करणाऱया भाविकांवर नजर ठेवण्यासाठी खास लाईफ गाईडची व्यवस्था करण्यात आली आहे. शारीरिक विकलांग असणारे तसेच गरोदर माता व वयोवृद्धांना स्वतंत्र दर्शन रांग ठेवण्यात आली आहे.

देवस्वाऱयांचे आगमन

श्रीदेव कुणकेश्वरच्या भेटीसाठी श्री देवी पावणादेवी, हुंबरट-कणकवली, श्री देवी भगवती मुणगे या दोन देवस्वाऱया सायंकाळी कुणकेश्वरात दाखल झाल्या. आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर रात्रीच्या काळोखात उजाळून निघाला आहे. समुद्रकिनारी देखील दुकाने थाटण्यात आली असून भाविकांना समुद्रस्नानासाठी व्यवस्थाही करण्यात आली आहे.

मान्यवरांची हजेरी

दिवसभरात श्रीदेव कुणकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी विविध राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळींनी हजेरी लावली होती. यामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सपत्नीक श्रीदेव कुणकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा ट्रस्टचे अध्यक्ष नाणेरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष अरविंद वाळके, एकनाथ तेली, प्रमोद आंबेरकर, रावजी वाळके आदी उपस्थित होते. तसेच आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांनीही श्रीदेव कुणकेश्वराचे दर्शन घेतले.

प्रशासन यंत्रणेचे सुयोग्य नियोजन

पहाटेपासून जिल्हय़ातील विविध भजन मंडळांनी भजने सादर केली. भाविकांना देवदर्शन लवकर होण्यासाठी यावर्षी देवस्थान ट्रस्टच्यावतीने सुलभ व खास व्यवस्था केली आहे. यावर्षी श्रीदेव कुणकेश्वराचे दर्शन लवकर व्हावे, याकरिता देवस्थान ट्रस्टने देवाच्या गाभाऱयात प्रवेश न देता गाभाऱयाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी देवाच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे सहा ते सात तास रांगेत उभे राहणाऱया भाविकांना अवघ्या दोन ते तीन तासांत देवाचे दर्शन मिळू लागले आहे.

सुरक्षिततेच्यादृष्टीने विशेष खबरदारी

संपूर्ण यात्रेवर नजर ठेवण्यासाठी 40 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मंदिर परिसर, बाजारपेठ व विशेषतः समुद्र किनारी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यात्रा कालावधीत कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये व अनुचित प्रकार टाळण्यासाठी ग्रामपंचायत विभागाकडूनही योग्य खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच देवगड महसूल विभागाकडूनही आढावा घेण्यात येत आहे. देवगडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणेकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सलग तीन दिवस एसटीच्या जादा बसफेऱया

यात्रोत्सवात वाहतूक नियंत्रणाकडे जास्त लक्ष देण्यात आले आहे. एस. टी. महामंडळाने सलग तीन दिवस भाविकांना सेवा देण्याचे वेळापत्रक ठेवले असून गावोगावी जादा बसफेऱया सोडण्यात येत आहेत. शनिवारी यात्रेत विक्रमी गर्दी होण्याची शक्यता असून रात्रीपासून तीर्थस्नानासाठी भाविक व देवस्वाऱयांची मंडळी गर्दी करतील. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून खबरदारी घेण्यात आली आहे.

भाविकांना सोयीसुविधा

कुणकेश्वर देवाच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांना सर्वतोपरी व्यवस्था होण्यासाठी काही दानशूर व्यक्ती व संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते सुधीर जाधव यांच्याकडून मोफत प्रसाद वाटप तर उद्योजक कुलदीप पेडणेकर यांच्याकडून भाविकांना मोफत सरबत वाटप केले जात आहे. मुंबईच्या सौ. रेखा भास्कर भोईर यांनी फ्लॉवर्स डेकोरेशनची व्यवस्था केली आहे. देवगड स्टेट बँक व देवगड अर्बन बँक यांच्यावतीने पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी वॉटर कुलर सिस्टीम मोफत दिली आहे. तसेच भाविकांना रांगेतून मोफत पाण्याची सीआयआर पंपस् यांच्यावतीने करण्यात आली आहे.

मिठमुंबरी-तारामुंबरी पुलावरून कुणकेश्वर येथे जाण्यासाठी भाविकांची दिवसभर वर्दळ सुरू होती. काही दिवसांपूर्वी तारामुंबरी येथून पुलावर जाण्यासाठी पायऱयांची व्यवस्था केल्यामुळे भाविकांना कुणकेश्वरचे अंतर केवळ पाच कि. मी. चे झाले. मिठमुंबरी येथे एसटी व खासगी वाहतूक असल्यामुळे भाविकांनी या मार्गाचा अधिक लाभ घेतल्याचे दिसून येत आहे.

26 रोजी तीर्थस्नानाची महापर्वणी

26 फेब्रुवारी रोजी रविवार सुट्टीचा दिवस असून भाविक मोठय़ा संख्येनी श्रीदेव कुणकेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी करतील. त्याचप्रमाणे यादिवशी अमावस्या असून दर्शनानंतर तीर्थस्नानास भाविकांना व देवभेटी करीता येणाऱया देवस्वाऱयांना संपूर्ण दिवसभर लाभ घेता येणार आहे. समुद्र किनाऱयावरील सर्व भागात विद्युत व्यवस्था तसेच पुरुष व महिलांना ठिकठिकाणी स्नानानंतर कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा व कुणकेश्वर ग्रामस्थांकडून सुरक्षा पथके ठेवण्यात येणार आहेत.