|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तीर्थस्थानी उसळला भाविकांचा प्रतिमहासागर

तीर्थस्थानी उसळला भाविकांचा प्रतिमहासागर 

देवगड : श्री देव कुणकेश्वर यात्रेची सांगता रविवारी सायंकाळी पवित्र तीर्थस्नानाने झाली. लाखो भाविक श्री देव कुणकेश्वराला नतमस्तक होऊन सागरतीर्थावर पवित्र स्नानाचा आनंद घेत होते. ‘हर-हर महादेव’चा जयघोष सुरुच होता. रविवारी सायंकाळपर्यंत भाविकांनी गर्दी केली होती. शेवटचा दिवस असल्यामुळे भाविकांनी खरेदीसाठीही गर्दी केली होती. देवस्वाऱयांनीही तीर्थस्नान केले. यात्रोत्सवाच्या तीन दिवसांच्या कालावधीत लाखोंची आर्थिक उलाढाल झाली.

रविवारी अमावस्येचा पवित्र दिन हा तीर्थस्नानासाठी ओळखला जातो. या पर्वणीचा लाभ घेण्यासाठी लाखो भाविक श्री देव कुणकेश्वराच्या दर्शनासाठी सागर किनाऱयावर दाखल झाले होते. अमावस्येची सागराला भरती आली होती. तर समुद्र किनाऱयावर शिवभक्तीच्या सागराची भरतीच जणू आली होती. दुपारच्या प्रचंड उन्हातही भाविक भक्तगण तीर्थस्नान करीत होते. धार्मिक विधीचे कार्यक्रमही सागर किनाऱयावर उरकण्यात येत होते. तीनही दिवशी महसूल प्रशासन यंत्रणेने तसेच पोलीस यंत्रणेने योग्य नियोजन केले होते. महसूलच्यावतीने तहसीलदार  वनिता पाटील, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली सेवा प्रशासन यंत्रणेकडून प्राप्त झाली होती. वीज वितरण कंपनीकडून कोणत्याही प्रकारे वीजपुरवठा खंडित होता नये, याची खबरदारी घेण्यात आली होती. स्वतंत्र कक्षात वीज वितरणचे कर्मचारी अहोरात्र तैनात ठेवण्यात आले होते.

सुलभ दर्शन व्यवस्थेचे कौतुक

यावर्षी यात्रेत येणाऱया सर्व भाविकांना श्रींचे दर्शन वेळेत मिळण्यासाठी देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आलेल्या व्यवस्थेचे भाविकांनी कौतुक केले. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक नाणेरकर व ट्रस्टचे पदाधिकारी, कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष प्रकाश वाळके, पदाधिकारी तसेच कुणकेश्वर सरपंच नयना आचरेकर, उपसरपंच रामानंद वाळके, ग्रामसेवक पांडुरंग शेटगे यांनीही चोख व्यवस्था राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले. ग्रामस्थांकडून दिवस-रात्रीचे नियोजन करून येणाऱया भाविकांना सेवा देण्याचे काम करण्यात आले. वाडी मंडळांचे विविध स्वयंसेवक या कामात दाखल झाले होते.

भाविकांसाठी मोफत दंतचिकित्सा

भाविकांना दंतचिकित्सा मोफत ठेवण्यात आली होती. कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबई व ट्रस्टच्यावतीने मुंबई नायर दंतचिकित्सा रुग्णालयातील वैद्यकीय पथक दाखल झाले होते. आरोग्य यंत्रणेकडून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कोंडके व त्यांच्या सहकाऱयांनी चांगले काम केले. विविध सेवाभावी संस्थांनीही भाविकांच्या सेवेसाठी मदतीचा हात दिला.

प्रवासासाठी मिठमुंबरी-तारामुंबरी पुलाला पसंती

देवगड, मालवण, कणकवली या एसटी आगाराने प्रवासी वर्गासाठी योग्य नियोजन केल्यामुळे भाविकांना जास्त काळ एसटी बसची प्रतीक्षा करावी लागली नाही. नव्याने उभारण्यात आलेला मिठमुंबरी-तारामुंबरी पूल पादचाऱयांसाठी खुला करण्यात आला. याचा फायदा हजारो भाविकांना झाला. या पुलावरून जाताना भाविकांना निर्सग सौंदर्याचा आनंदही लुटता आला. पुलावर मोठी वर्दळ पाहता आली. अनेक भाविकांनी केलेल्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले. तारामुंबरी नाका येथे व मिठमुंबरी बागवाडी येथे खासगी व रिक्षा वाहतूक व्यवस्थेचा फायदा पुलावरून जाणाऱया भाविकांना झाला. अवघ्या काही मिनिटाच कुणकेश्वर येथे पोहोचल्याचे समाधान चेहऱयावर होते.

रविवारी बाजारपेठांत खरेदीसाठी भाविकांची गर्दी

रविवारी सकाळपासूच बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. भर उन्हातही भाविकांनी खरेदीकडे जास्त लक्ष दिले होते. लाखोंची आर्थिक उलाढाल यात्रा कालावधीत झाली. उन्हाचा पारा चढल्यामुळे आईस्क्रीम, कोल्ड्रींक्सची दुकाने तेजीत होती. कलिंगडाचा बाजारही वाढत्या तापमानामुळे  तेजीत होता. समुद्र किनारी विविध खाद्य पदार्थांची दुकाने मांडण्यात आली होती. तसेच करमणुकीचे विविध स्टॉल उभारण्यात आले होते. उंटाची सफरही लक्षवेधी होती.

महसूल, पोलीस व ट्रस्टकडून चोख बंदोबस्त

तीर्थस्नानाचा आनंद लुटत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी देवस्थान ट्रस्ट व प्रशासन यंत्रणेकडून दखल घेण्यात आली होती. जीव रक्षकांबरोबरच स्वयंसेवकही तैनात करण्यात आले होते. समुद्राच्या मध्यभागी सुरक्षिततेच्यादृष्टीने महाराष्ट्र पोलिसांची स्पीडबोट तैनात करण्यात आली होती. तसेच स्वच्छतेच्यादृष्टीने कुणकेश्वर ग्रामपंचायतीकडून खास व्यवस्था करण्यात आली होती.