|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळुणात पुन्हा डोंगर खोदाई सुरू

चिपळुणात पुन्हा डोंगर खोदाई सुरू 

प्रतिनिधी/ चिपळूण

rयेथील विविध भागातील डोंगर कटाई अद्यापही सुरूच आहे. शिवाजीनगर येथील डोंगरातील उत्खननही नुकतेच करण्यात आले आहे. त्यामुळे या भागात पुन्हा एकदा दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या विषयी येथील नागरिकांमधून जोरदार ओरड केली जात आहे.

सध्या शहरात इमारतींची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यातच शहरातील बहुतांशी भाग पूररेषेखाली असल्याने येथे इमारतींसाठी जमिनी उपलब्ध होताना कठीण बनले आहे. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी शहरालगतच्या डोंगर उतारावर लक्ष केंद्रीत केले आहे. अनेक ठिकाणी डोंगर उतारावर नव्या इमारतींचे बांधकाम मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. मात्र त्यासाठी उत्खनन करून सपाटीकरण केले जात आहे. त्या शिवाय पूररेषेतून बाहेर येण्यासाठी काही ठिकाणी भरावही केला जात आहे. या भरावासाठीही डोंगर उत्खनन केले जाते. एकूणच कधी सपाटीकरणासाठी तर कधी भरावासाठी उत्खनन होत असल्याने हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मात्र त्यावर प्रशासनाचे जराही अंकुश नसल्याने राजरोसपणे हे उत्खनन सुरूच आहे. परिणामी त्या-त्या भागातील जुन्या वस्तीला दरडीचा धोका निर्माण झाला आहे.

गोवळकोट येथील कदम-बौद्धवाडी येथे घरे उभारण्यासाठी पायथ्यालगतच्या लोकांनी उत्खनन केल्याने वरील वस्तीला धोका निर्माण झाला असून येथील 15हून अधिक कुटुंबियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पद्धतीने खेंड-कांगणेवाडी येथेही बांधकाम व्यावसायिकांनी उत्खनन केल्याने येथीलही जुन्या वस्तीला धोका निर्माण झाला आहे. याच द्धतीने शिवाजीनगर व बहादूरशेख नाका परिसरातही हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातल्या त्यात शिवाजीनगर येथील दरड धोकादायक असून पावसाळय़ात दरवेळी येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातो. मात्र त्यानंतर या भागात उत्खनन होणार नाही, या बाबतची खबरदारी घेण्याऐवजी आजही येथे राजरोसपणे उत्खनन सुरूच आहे. त्यामुळे येथील जुन्या वस्तीला मोठा धोका निर्माण झाला आहे.

येथील शासकीय कार्यालयांपासून हाकेच्या अंतरावर या घटना घडत आहेत. मात्र प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शिवाजीनगर येथील डोंगर उतारावरील बहुतांशी भागात उत्खनन केलेले दिसत आहे. तसेच या भागातून माती वाहून नेण्यासाठी शिवाजीनगर रस्ता हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे हे उत्खनन सहज नजरेस पडण्यासारखे आहे. तरीदेखील या विषयी कारवाई होताना दिसत नाही. एकूणच येथील महसूल यंत्रणेच्या कारवाईविषयी साशंकता व्यक्त होत आहे.