|Monday, November 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हापसा व्यापाऱयांचा आज पालिकेवर मोर्चा

म्हापसा व्यापाऱयांचा आज पालिकेवर मोर्चा 

प्रतिनिधी/ म्हापसा

म्हापसा व्यापारी संघटनेतर्फे सोमवार 27 रोजी सकाळी 10 वा. पालिका कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी व्यापाऱयांशी बैठक घेऊन  मोर्चा यशस्वी करण्याचे ठरविले आहे. सोमवारी सकाळी 9.30 होणाऱया या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

व्यापारी संघटनेने याबाबत पालिकेत नगराध्यक्षांना पत्र सादर करून 27 रोजी सकाळी 10 वा. भेटीसाठी वेळ मागितला आहे. बाजारपेठेतील काही विषयांवर नगराध्यक्ष तथा पालिका अधिकाऱयांशी चर्चा करायची आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान 27 रोजी सकाळी 11 वा. पालिकेच्या 2017-18 या वर्षांच्या अंदाजपत्रकावर चर्चा करून त्याला मंजुरी देण्यासाठी पालिका मंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. व्यापारी संघटनेच्या भेटीसाठी वेळ मागणारे पत्र आपल्याला मिळाले नसल्याचे नगराध्यक्षांचे म्हणणे आहे. मोर्चा विषयी आपण वर्तमानपत्रातील बातमी वाचली असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. त्यामुळे सोमवारी नगराध्यक्ष व्यापारी संघटनेच्या शिष्यमंडळाला वेळ देतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

बाजारपेठेतील व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी असलेल्या नगरसेवकांच्या बाजार समितीच्या आशीर्वादानेच तसेच सोपो कंत्राटदारांच्या पाठिंब्याने बाजारपेठेतील गैरप्रकार सुरू असल्याचे व्यापाऱयांचे म्हणणे आहे.

भाजी मार्केट पूर्वीच्या जागेवरुन स्थलांतरीत केल्यावर बाजारपेठेतील काही जागा मोकळी झाली होती. या जागेचा उपयोग दुचाकी वाहने उभी करण्यासाठी करण्याचे पालिकामंडळाने ठरविले आहे. मात्र ही जागा परप्रांतियांनी हडप केल्याचे येथे दिसून येते. या ठिकाणी मसाले व कपडेवाले मोठय़ा प्रमाणात येऊन बसले आहे. यात काही नगरसेवकांचा हात असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी गॉडफादरच्या आशीर्वादानेच म्हापशात सर्व व्यवहार चालत असल्याचे सांगण्यात आले.

 

Related posts: