|Friday, October 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘मूनलाइट’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

‘मूनलाइट’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट 

ऑस्करमध्ये नाटय़ : लाल ला लँडच्या नावाने आधी झाली घोषणा

लॉस एंजिलिस /वृत्तसंस्था

सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार मानल्या जाणाऱया 89 व्या ऑस्करमध्ये ‘मूनलाइट’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला. परंतु सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी चुकून ‘ला ला लँड’च्या नावाची घोषणा झाल्याने काहीसे नाटय़ पाहावयास मिळाले. नंतर मूनलाइटला हा पुरस्कार देण्यात आला. 14 वर्गवारीत नामांकन मिळालेल्या ला ला लँडने सर्वाधिक 6 पुरस्कार आपल्या नावावर केले. एमा स्टोन ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर केसी एफ्लेक हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला.

निवेदक वॉरेन बीटी यांच्या हातात चुकीच्या वर्गवारीचा लिफाफा आला. ज्यामुळे काही काळ ते गप्पच राहिले. याचदरम्यान त्यांच्यासोबत उभ्या असलेल्या निवेदिकेने ला ला लँड च्या नावाची घोषणा केली. परंतु तेव्हा तेथे उपस्थित एका निर्मात्याने ही चूक दाखवून देत योग्य लिफाफा काढला आणि मूनलाइटला सर्वोत्कृष्ट चित्रपट घोषित केले. नंतर पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालक जिमी किमेल यांनी या प्रकरणी आपली चूक मानली.

सर्वोत्कृष्ट अभिनेता केसी एफ्लेक

लॉस एंजिलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘मँचेस्टर बाय द सी’साठी केसी एफ्लेक तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘ला ला लँड’ची अभिनेत्री एमा स्टोन हिला मिळाला. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार ला ला लँडच्या डेमियन शॅजेल यांना प्राप्त झाला.

द जंगल बुकलाही पुरस्कार

ब्रिघम टेलर यांचा चित्रपट ‘द जंगल बुक’ने सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा पुरस्कार आपल्या नावावर केला. तर भारतीय वंशाचा ब्रिटिश कलाकार देव पटेल यांना पुरस्कार मिळविण्यास अपयश आले. त्याला ‘लॉयन’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले होते. त्याच्याऐवजी महर्शेला अली यांना मूनलाइट चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा मान ‘फेंसेस’ या चित्रपटातील अभिनयासाठी व्हिओला डेव्हिस हिने मिळविला आहे.

ला ला लँडची ऑस्करवर छाप

सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटाचा पुरस्कार इराणी दिग्दर्शकइ असगर फरहदी यांच्या ‘द सेल्समॅन’ला देण्यात आला. तर 14 वर्गवारीत नामांकन मिळविलेल्या ‘ला ला लँड’ने सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइनमध्ये यावर्षीचा पहिला ऑस्कर जिंकला. चित्रपटाला ‘सिटी ऑफ स्टार्स’ या गाण्यासाठी ओरिजिनल साँग पुरस्कार देखील मिळाला. तर सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठीचा पुरस्कार ‘ला ला लँड’नेच पटकाविला. तर सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड फीचर चित्रपटाचा पुरस्कार ‘ज्यूटोपिया’ने आपल्या नावावर केला. ‘व्हाइट हेल्मेट्स या माहितीपटाला शॉर्ट सब्जेक्ट डॉक्युमेंट्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड लघूपटाचा पुरस्कार ‘पायपर’ला मिळाला आहे. ओरिजिनल स्क्रीनप्लेसाठी ‘मँचेस्टर बाय द सी’ चित्रपटासाठी कीनथ लोनार्गन यांनी पटकाविला आहे.

संघर्षरत अभिनेत्रीची कहाणी ‘ला ला लँड’

ला ला लँड चित्रपटाची कथा ही एक संघर्षरत अभिनेत्री आणि संगीतकारावर आधारित आहे. दोघेही एकमेकांना भेटतात आणि हळूहळू प्रेमात पडतात. चित्रपटात एमा स्टोन ही संघर्षरत अभिनेत्रीच्या भूमिकेत जी एका कॉफी शॉपमध्ये काम करत असते. तर अभिनेता रेयान गॉसलिंग संगीतकाराच्या भूमिकेत आहे.

गरीब, कृष्णवर्णीय मुलावर आधारित मूनलाइट

मूनलाइट चित्रपटाचे दिग्दर्शन बेरी जेनकिंस यांनी केले असून हा चित्रपट एक गरीब आणि कृष्णवर्णीय मुलावर आधारित आहे. त्याला लहानपणात अनेकवेळा आणि अनेकठिकाणी दुर्लक्षित केले जाते. त्याची आई नशा करत असते. मुलगा समलैंगिक संबंधांवरून होत असलेला भेदभाव आणि गरीबीशी झगडत मोठा होताना दाखविण्यात आला आहे.

ओम पुरींचे स्मरण

ऑस्कर सोहळ्यात दिवंगत बॉलिवडू अभिनेते ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सोहळ्यात एका विशेष कार्यक्रम सादर करून अलिकडेच्या निधन झालेल्या कलाकारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ओम पुरी यांनी हिंदीबरोबरच हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला होता, त्यामुळे या यादीत त्यांचे नाव देखील समाविष्ट होते. ओम पुरी यांनी ‘ईस्ट इज ईस्ट’, ‘गांधी’, ‘सिटी ऑफ जॉय’ आणि ‘वुल्फ’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ओम पुरी यांच्याबरोबरच कॅरी फिशर, प्रिन्स, जेने वाइल्डर, मायकल किमिनो, पॅटी डय़ूक, गॅरी मार्शल, एंटन येल्चिन, मॅरी टेलर मूर, कर्टिस हॅनसन आणि जॉन हर्ट यांचे स्मरण करण्यात आले.

Related posts: