|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेडकिहाळमध्ये विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

बेडकिहाळमध्ये विहिरीत पडून युवकाचा मृत्यू 

वार्ताहर/ बेडकिहाळ

बेडकिहाळ (ता. चिकोडी) येथील महावीरनगर परिसरातील युवकाचा येथील विजेराव इनामदार सरकार यांच्या मालकीच्या विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवार 27 रोजी दुपारी 12 च्या दरम्यान उघडकीस आली.  तात्यासाब ऊर्फ अनिल नरेंद्र तेरदाळे (वय 35) असे मृताचे नाव आहे.

 घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तात्यासाब हा महावीरनगर परिसरातील रहिवासी आहे. तो अनेक दिवसांपासून ट्रकचालक म्हणून काम करत होता. नेहमीप्रमाणे तो 27 रोजी सकाळी कामाला जाण्यासाठी बाहेर पडला होता. पण रात्री उशीरापर्यंत घरी परत न आल्याने त्याला मोबाईलद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा संपर्क होऊ शकला नाही. तसेच तात्यासाब ज्या ठिकाणी कामाला होता तेथेही चौकशी करण्यात आली. पण तो तेथेही नव्हता. तेरदाळे कुटुंबियांनी 28 रोजीही तात्यासाबचा परिसरात शोध घेतला.

 त्याच्याच घरापासून काही अंतरावर भोज-बेडकिहाळ मार्गावरील इनामदार सरकार यांची विहीर आहे. येथील मोटर इलेक्ट्रीशियन दिलीप वाडेकर हे त्या विहिरीवर मोटर दुरुस्तीसाठी गेले होते. यादरम्यान ते विहिरीतील पाणी पाहण्यासाठी गेले असता त्यांना पाण्यावर पांढऱया रंगाचा शर्ट दिसून आला. त्याची माहिती त्वरित येथील शेतकामगार आप्पा व सुखदेव यांना दिली. त्यानुसार ते दोघे घटनास्थळी आल्यानंतर पाण्यावर मृत्तदेह तरंगताना दिसून आला. याची माहिती उपस्थितांनी शेतमालक विजेराव इनामदार यांना दिली. विजेराव सरकार यांनी सदर घटनेची माहिती सदलगा पोलीस स्टेशनला दिली.

 दुपारी 12 च्या दरम्यान सदलगा पोलीस स्टेशनचे फौजदार होसमनी, साहाय्यक पोलीस चंद्रकांत सारापुरे यांनी घटनास्थळी भेट देवून मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यास सांगितले. पंचनामा दरम्यान अशी माहिती मिळाली की, सदर मृत युवक घरी जात असताना रात्रीच्यावेळी पाय घसरून दगडावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज बांधण्यात आला आहे. कारण युवकाच्या डोक्याच्या मागील बाजूस मोठी जखम होऊन रक्तस्त्राव झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 घटनास्थळी आई-वडील व नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. सदर घटनेची नोंद सदलगा पोलिसात करण्यात आली असून शवविच्छेदन सदलगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करून मृतदेह सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

घटप्रभा नदीत बुडून मुलाचा मृत्यू

घटप्रभा : घटप्रभा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गोकाक तालुक्यातील तिगडी येथे घडली आहे. सुरेश गुरुसिद्धप्पा पाटील (वय 14) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तिगडी येथून वाहणाऱया घटप्रभा नदीमध्ये पोहण्यासाठी सुरेश हा मित्रांसोबत गेला होता. यावेळी पोहत असताना पाणी वाहत असल्याने जोरदार लाटेत तो वाहत जाऊन बुडू लागला. यावेळी मित्रांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत तो बुडून वाहून गेला. याप्रसंगी मुडलगी, गोकाक अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. परंतु, सुरेशचा मृतदेह मिळाला नाही. तीन दिवसानंतर सुनदोळी येथे नदीपात्रात मृतदेह सापडला. यावेळी सुरेशच्या पालकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत होती. घटनेची नोंद कुळगोड पोलीस स्थानकात झाली आहे.