|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिधापत्रिकांवरील गॅस नोंदणीत तफावती

शिधापत्रिकांवरील गॅस नोंदणीत तफावती 

कणकवली : गतवर्षीपासून शासनाने केरोसीनचा कोटा हा केवळ गॅस जोडणी नसलेल्या ग्राहकांसाठीच उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कार्यवाही करूनही गॅस कंपन्यांकडून शासनाला कळविण्यात आलेली गॅसधारकांची संख्या व त्या-त्या जिल्हय़ातील क्षेत्रीय कार्यालयांनी शिधापत्रिकांवर गॅस स्टँपिंग करून शासनाला कळविलेली संख्या यात मोठी तफावत असल्याचे पुढे आले आहे. यात अनेक शिधापत्रिकांवर गॅस जोडणीचा शिक्काच मारलेला नसल्याचे दिसून आल्यामुळे गॅसधारक असलेल्या ग्राहकांच्या शिधापत्रिकांवर स्टँपिंग करणे (शिक्का मारणे) तसेच किरकोळ केरोसीन परवानाधारकांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याने अनेकांचा केरोसीन पुरवठा बंद होणार आहे.

 शासनाने आधारकार्ड असलेल्या ग्राहकांनाच अनुदानित केरोसीन देण्याचा निर्णयही यापूर्वी घेण्यात आला आहे. मात्र, काही ठिकाणांहून अद्याप अशी कार्यवाही करून याद्या कळविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अशा याद्याही तात्काळ कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

15 दिवसांत स्टँपिंग

शासनाकडून सर्व तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी, सर्व उपनियंत्रक, शिधावाटप यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील केरोसीनपात्र लाभार्थ्यांची आधार क्रमांकासह माहिती स्थानिक गॅस एजन्सीला उपलब्ध करून द्यावी. गॅस एजन्सीकडे उपलब्ध असलेल्या गॅसधारकांच्या माहितीचा या माहितीशी ताळमेळ घालून त्याआधारे संबंधित कार्यक्षेत्रातील गॅसधारकांची माहिती प्राप्त करून घेण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. गॅसधारकांची माहिती एजन्सीकडून प्राप्त झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत सर्व गॅसजोडणी शिधापत्रिकांवर  गॅस स्टँपिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केरोसीन पात्र लाभार्थ्यांची आधार क्रमांकासह माहिती स्थानिक गॅस एजन्सींना उपलब्ध करून देणे व गॅस एजन्सीकडून गॅसधारकांची माहिती प्राप्त करून घेऊन सर्व गॅस जोडणी शिधापत्रिकांवर गॅस स्टँपिंग करण्याबाबतची व्यक्तीशः जबाबदारी सर्व संबंधीत तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी, सर्व उपनियंत्रक यांची राहणार आहे.

यापूर्वीच्या पुरवठय़ाचीही तपासणी

जेथे गॅस स्टँपिंग प्रमाण कमी आहे, अशा जिल्हय़ांत, मंडळात आकस्मिक तपासण्या करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यात शासनाकडून मंजूर अनुदानित दराचे केरोसीन केवळ बिगर गॅस जोडणी शिधापत्रिकाधारकांनाच वितरित करण्यात येते किंवा कसे? हे केरोसीन आधार क्रमांक सादर करणाऱया लाभार्थ्यांकडे गॅस जोडणी नाही, याबाबत खात्री करूनच ते वितरण करण्यात येते किंवा कसे याबाबतही तपासणी करण्यात येणार आहे. शिधापत्रिकांवर स्टँपिंग आहे, किंवा नाही, याबाबतही खात्री करायची आहे. 1 मार्च 2016 पासून केरोसीनपात्र लाभार्थी व त्यांना वितरित करण्यात आलेल्या केरोसीनची तपासणी करण्यात येणार आहे. गॅस स्टँपिंग शिधापत्रिकाधारकांच्या संख्येतील वाढ तपासण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्हय़ात विशेष पथकाचे गठण करण्यात येणार आहे.