|Monday, December 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बिद्री’ वर नियुक्त होणार अशासकीय मंडळ ?

बिद्री’ वर नियुक्त होणार अशासकीय मंडळ ? 

विजय पाटील / सरवडे

बिद्री साखर कारखान्याच्या मागील संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर या कारखान्यावर प्रशासकीय मंडळ आले. या प्रशासकीय मंडळाला तब्बल सव्वा वर्ष पुर्ण झाले तरी या कारखान्याची निवडणूक जाहीर झालेली नाही. कारखाना कार्यक्षेत्रातील नेते मंडळीना निवडणूकीची घाई झाली असताना नुकतेच पालकमंत्री चंद्रकांतदादादा पाटील यांनी किमान वर्षभर या कारखान्याची निवडणूक लागणार नाही असे भाकीत करून प्रस्थापित नेत्यांना धक्का दिला आहे. तर या कारखान्यावर लवकरच अशासकीय मंडळ देखील येणार असल्याचे सुचीत केले आहे. त्यामुळे कारखान्याची निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता अधिक गडद झाली असून कार्यरत असलेल्या प्रशासकीय मंडळामध्ये आणखी चार नेत्यांचा समावेश करून हे अशासकीय मंडळ नियुक्त केले जाणार आहे. मंडळात समाविष्ठ होणाऱया नेत्यांची नावे गुलदस्त्यात असून नियुक्तीनंतरच त्यामध्ये कोणाची वर्णी लागली हे कळणार आहे.

बिद्री साखर कारखान्याच्या वाढीव 14 हजार सभासदांच्या वादग्रस्त मुद्दय़ामुळे तत्कालीन अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या संचालक मंडळाला मुद्दतवाढ मिळाली होती. मात्र संचालक मंडळाची मुदत संपली असल्याने या ठिकाणी प्रशासक नेमावा अशी मागणी विरोधी मंडळीनी न्यायालयात केली होती. न्यायालयाने या कारखान्यावर प्रशासक मंडळ नियुक्त करण्याच्या सुचना राज्य शासनाला दिल्या होत्या. त्यानुसार 19 डिसेंबर 2015 रोजी या कारखान्यावर अरूण काकडे अध्यक्ष असलेले त्रिसदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. हे मंडळ सहा महिन्यांसाठी नियुक्त केले होते. मात्र कारखान्याच्या वाढीव सभासदांची छाननी पुर्ण न झाल्याने कारखान्याची निवडणूक वेळेत होवू शकली नाही. पर्यायाने प्रशासकीय मंडळाला मुदतवाढ मिळाली.

कारखान्याच्या वाढीव सभासदांची छाननी संथ गतीने सुरू असल्यामुळे निवडणूकीसाठीची पुढील प्रकीया थंडावत गेली. आता छाननी प्रक्रीया पुर्ण होत आल्याने कारखान्याची निवडणूक लवकरच होईल अशी आशा कारखाना कार्यक्षेत्रातील नेतेमंडळींना होती मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या प्रचारात आयोजित केलेल्या सभेत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या कारखान्याची निवडणूक किमान वर्षभर होणार नाही असे जाहीर भाकीत केले. राज्याच्या महसूल मंत्र्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे कारखान्याची निवडणूक लवकर होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

कारखान्याची निवडणूक लांबणीवर जाणार असल्याने कारखान्यावर कार्यरत असलेल्या प्रशासकीय मंडळाऐवजी अशासकीय मंडळ आणण्याच्या हालचालीही गतीमान झाल्या असून जिल्हा परिषद निवडणूकीत व निवडणूकीपुर्वी भाजपात प्रवेश केलेल्या व पाठींबा दिलेल्या मान्यवर नेते मंडळींचा या अशासकीय मंडळात समावेश केला जाणार आहे. सत्तेच्या माध्यमातून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठी आखलेली व्यूव्हरचना व तसेच भाजपाच्या वाढीसाठी अन्य पक्षातील नेत्यांना दिलेली अशासकीय मंडळाची ऑफर यामधून  त्यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील प्रस्थापित मातब्बरांना धक्का देण्याचे काम केले आहे. अशासकीय मंडळासाठी आश्वासीत केलेल्या नेत्यांना संधी देण्यासाठीच्या हालचाली सुरू असून लवकरच हे अशासकीय मंडळ नियुक्त होणार आहे.

Related posts: