|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रायबाग-अंकली मार्गावर रास्तारोको

रायबाग-अंकली मार्गावर रास्तारोको 

वार्ताहर / रायबाग

यड्राव ग्रामपंचायतीत मंजूर झालेल्या घरकुल वाटपात घोटाळा झाला आहे. योग्य लाभार्थींना घरांचे वाटप होण्याऐवजी इतरांनाच झाले आहे. त्यासाठी योग्य त्या लाभार्थींना घरे वाटप करावीत. यासाठी यड्राव येथील गटाने रायबाग-अंकली मार्गावर रास्तारोको करून टायर पेटवून निदर्शने केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी, रायबाग तालुक्यातील यड्राव ग्रामपंचायतीला बसव वसती योजनेंतर्गत 100 घरे मंजूर झाली आहेत. येथील ग्रामपंचायत अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली त्यांनी हव्या त्या नागरिकांना घरे मंजूर केली आहेत, असा आरोप करून याचा निषेध करण्यात आला. तसेच अध्यक्ष व ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी यांच्याविरुद्ध घोषणा देण्यात आल्या.

यापूर्वी ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी डी. एम. जक्कप्पगोळ यांना निवेदन देण्यात आले होते. पण अद्याप कार्यवाही नाही. तसेच राज्य रस्ता अभिवृद्धी निगम उपाध्यक्ष महावीर मोहिते यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोहिते यांनी ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकाऱयांची भेट घेऊन चर्चा केली व योग्य लाभार्थींनाच घरे द्यावीत, अशी सूचना केली. यावेळी हणमंत धनगर, राघवेंद्र मांग, शिवाजी केंचे, महेश मांग, उमेश केंचे, महादेवी केंचे, सत्यव्वा मांग, भारती मांग, सुनील मांग यांच्यासह नागरिक उपस्थित होते.