|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » मान्सूनवर एल निनोचे सावट

मान्सूनवर एल निनोचे सावट 

प्रतिनिधी/ पुणे

 भारतीय मान्सूनवर विपरित परिणाम करणारा एल निनो 2017 मध्ये पुन्हा उद्भविण्याचा अंदाज ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे भारतावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, देशवासियांच्या चिंतेत भर पडली आहे.

 प्रशांत महासागरात निर्माण होणाऱया गरम पाण्याच्या प्रवाहांना एल निनो असे म्हणतात. एल निनो आर्द्रतायुक्त वारे ओढून घेत असल्याने त्या-त्या वर्षी मान्सूनवर त्याचा परिणाम होत असतो. त्यादृष्टीने हा एल निनो भारतीयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतो. तर ला निनो अर्थात थंड पाण्याच्या प्रवाहाच्या प्रभावामुळे मान्सून चांगला झाला आहे. 2015 मध्ये प्रशांत महासागरात एल निनो निर्माण झाला होता. त्यामुळे या वर्षी मान्सूनवर प्रतिकूल परिणाम झाला आणि सरासरीच्या उणे 14 टक्के पाऊस झाला. जानेवारी 2016 पर्यंत एल निनोचा प्रभाव कमी झाल्याने यावर्षी सरासरीच्या 96 टक्के पाऊस झाला. मागील वर्षी पाऊस सरासरीच्या आसपास झाल्याने गेल्या दोन वर्षातला दुष्काळ धुऊन गेला होता. मात्र, पुन्हा एल निनोचे भाकित वर्तविल्याने देशवासियांची धाकधूक वाढली आहे.

 यापूर्वी एन निनोची स्थिती न्यूट्रल होती. ही स्थिती असल्यास त्याचा कोणताही प्रतिकूल परिणाम पावसावर होत नाही. मात्र, ऑस्ट्रेलियन हवामान विभागाच्या अंदाजानुसार प्रशांत महासागरात परिस्थितीत बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे 2017 मध्ये एल निनो उद्भवण्याची 50 टक्के शक्यता आहे. जून 2016 नंतर पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाच्या तापमानात सरासरीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. याशिवाय पुढील सहा महिन्यांत मध्य प्रशांत महासागरातील तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे सतर्कता बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे. या एल निनोमुळे ऑस्ट्रेलियातील हिवाळा आणि वसंत ऋतूला फटका बसला आहे. याशिवाय तापमान वाढीवरही त्याचा प्रभाव होत आहे.

 अर्थव्यवस्थेवर परिणाम

 दोन वर्षाच्या दुष्काळानंतर 2016 ला सरासरीच्या आसपास मान्सून पोहोचला होता. त्यामुळे होरपळलेल्या जनतेला किंचित दिलासा मिळाला. कोरडी ठक्क पडलेली धरणेही या पावसात भरली. परंतु, पुन्हा पाऊस कमी झाल्यास महागाईचा भडका, शेअरबाजार, कृषी यांसह सर्व घटकांवर परिणामाची शक्यता आहे.

 एल निनोची शक्यता वर्तविणे घाईचे : आयएमडी

 याबाबत बोलताना पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ डॉ. ए. के, श्रीवास्तव म्हणाले, एल निनोची शक्यता आत्ताच वर्तविणे घाईचे ठरेल. याची स्थिती एप्रिलमध्ये स्पष्ट होईल. आकडे हातात आल्यानंतर अंदाज वर्तविता येईल.