|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंगणेवाडी दुमदुमली!

आंगणेवाडी दुमदुमली! 

आंगणेवाडी : ‘मुखदर्शन द्यावे आता, तू सकल जनांची माता’च्या जयघोषात लाखो भाविक आंगणेवाडीतील श्री देवी भराडी मातेच्या चरणी गुरुवारी नतमस्तक झाले. दहा रांगांमुळे अतिशय शिस्तबद्ध नियोजन होऊन भाविकांना सुलभपणे दर्शन घेता आले. पहाटे तीनपासून मंगलमय वातावरणात भराडी मातेच्या दर्शनास प्रारंभ झाला. भाविक मध्यरात्रीच आंगणेवाडीत दाखल झाले होते. यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत भाविकांची मोठी गर्दी होती. आज आठ ते दहा लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज आहे. बारावी, दहावीच्या परीक्षांमुळे आंगणेवाडीत सकाळच्या सत्रात काहीशी गर्दी कमी प्रमाणात दिसून येत होती. मात्र, दुपारनंतर गर्दीने उच्चांक गाठण्यास सुरुवात केली.

मान्यवरांनी घेतले दर्शन

 शालेय शिक्षण व सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री दीपक केसरकर, बंदरराज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, माजी आमदार विजय सावंत, आमदार अजय चौधरी, आमदार मंगेश कुडाळकर, अभिनेते अरुण कदम व दिगंबर नाईक, आमदार ऍड. अनिल परब, कबड्डीपटू रोहित राणा, विशाल माने, जादूगार वैभव कुमार, मुंबईचे नगरसेवक आत्माराम चाचे, सदानंद परब, किशोरी पेडणेकर, शशिकांत पाटकर, आमदार भाई गिरकर, नगरसेविका शैलजा गिरकर, संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, आमदार आशिष शेलार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार शिवराम दळवी, राजन तेली, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, अखिल भारतीय भंडारी समाज संघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे आशिष पेडणेकर, मुंबई शूटिंगबॉल असोसिएशनचे सेक्रेटरी दीपक सावंत, कोकण ऍग्रोचे दीपक परब आदींनी भराडी मातेचे दर्शन घेतले. यावेळी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना यांच्या नेत्यांसोबत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार सहभागी झाले होते.

दहा रांगांद्वारे गर्दीवर नियंत्रण

आंगणेवाडी यात्रा आणि भाविकांची गर्दी हे समीकरण जणू गेली काही वर्षे रुढ झाले आहे. गर्दीचे सुयोग्य नियोजन ही तर आंगणेवाडी यात्रेची खासियत. दरवर्षी गर्दीचा अनोखा उच्चांक होत असून नियोजनातही सातत्याने बदल केला जातोय. यंदा दहा रांगांद्वारे गर्दीची विभागणी करण्यात आली. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. त्यामुळे भाविकांना पंधरा ते वीस मिनिटांत भराडी देवीचे दर्शन होणार, हा आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचा दावा खरा ठरला. पहाटे तीनपासूनच मातेच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली होती. मंदिर परिसरात आकर्षक मंडप उभारण्यात आल्याने धुरळय़ाचा त्रास नव्हता. अत्यंत प्रफुल्लित वातावरणात भाविकांना ‘याची देही याची डोळा’ मातेचे रुप डोळय़ांमध्ये साठवता आले.

खारदांडा येथून भाविक आले पायी

 मुंबई-खारदांडा येथील ओम साई पदयात्रा सेवा मंडळाचे भाविक पदयात्रेद्वारे भराडी मातेच्या दर्शनासाठी निघाले होते. सलग तिसऱया वर्षी यात सहभागी झाले होते. आज त्यांचे आंगणेवाडीत आगमन झाले. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने त्यांचे स्वागत केले. तुलाभारासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. नारळ, गूळ, साखर आदी वस्तूंद्वारे तुला सुरू होत्या. पहाटेपासून सुरू झालेला भाविकांचा ओघ रात्री उशिरापर्यंत कायम होता. कणकवली व मालवण या दोन्ही ठिकाणी साधारण एक किमी लांब रांगा उशिरापर्यंत होत्या. मात्र, या रांगा सुनियोजित व्यवस्थापनामुळे फार काळ लांबल्या नाहीत, हे वैशिष्टय़ ठरले. सजलेली दुकाने, वाहनांची वर्दळ, भाविकांचा अमाप उत्साह, यात्रा यशस्वीतेसाठी राबणारी प्रशासकीय यंत्रणा, आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ व आंगणे कुटुंबीय यांचा वावर अशा भारलेल्या वातावरणाने संपूर्ण आंगणेवाडी परिसर आनंदून गेला होता. तुलाभारासह अन्य नवस फेडण्यासाठी मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित होते. जिल्हा आरोग्य विभाग, मालवण पंचायत समिती व मसुरे ग्रामपंचायतीतर्फे शासकीय योजनांची माहिती देण्यात येत होती. तालुका विधी सेवा समितीतर्फेही न्यायालयीन प्रक्रियेची माहिती देण्यात येत होती. ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले होते.

राजकीय पक्षांचे असेही योगदान

यात्रेमध्ये राजकीय पक्षांनीही योगदान दिले. शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक अरुण दूधवडकर यांनी मोफत सरबताचे वाटप केले. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यातर्फे मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप करण्यात आले. आप्पाजी आंगणे मित्रमंडळ आणि शिवसेनेतर्फे खिचडी व सरबत वाटप करण्यात आले. वैष्णोदेवी मित्रमंडळ, भांडुपतर्फे भाविकांना मोफत बिस्कीट व सरबत वाटप करण्यात येत होते. आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्यातून आयोजित राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडारसिकांची गर्दी झाली होती. आमदार नितेश राणे यांच्यावतीने काँग्रेस स्वागत कक्षात मोफत आधारकार्ड नोंदणी करण्यात येत होती. मुंबई महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार शिवसेनेतर्फे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आंगणेवाडीत करण्यात आला. त्यामुळे शिवसेना लोकप्रतिनिधींची एकच गर्दी आंगणेवाडीत दिसत होती. शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱयांनी बांधलेल्या भगव्या फेटय़ांमुळे आंगणेवाडीत वेगळेच वातावरण निर्माण झाले होते.

Related posts: