|Friday, July 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » राजकीय वातावरण तापविण्यासाठी ‘डायरी’ चा वापर

राजकीय वातावरण तापविण्यासाठी ‘डायरी’ चा वापर 

भाजप आणि काँगेस कार्यकर्ते आपला पक्ष आणि आपले नेते किती स्वच्छ आहेत हे जनमानसात ठासून सांगण्यासाठी सध्या सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करताना दिसत आहेत. डायरीमुळे कोणावर कारवाई होईल याची शक्मयता कमी असताना केवळ राजकीय वातावरण तापविण्यासाठी याचा वापर केला जात आहे.

कर्नाटकात उष्म्याबरोबरच काँग्रेस-भाजप या राष्ट्रीय पक्षांकडून हायकमांडला दिलेल्या बिदागीचा उल्लेख असलेल्या डायरीच्या चर्चेचा तापही वाढत चालला आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपला पक्ष आणि आपले नेते किती स्वच्छ आहेत हे जनमानसात ठासून सांगण्यासाठी सध्या सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करताना दिसत आहेत. खरेतर हायकमांडला सिद्धरामय्या यांनी एक हजार कोटी पोचवले आहेत हा आरोप प्रथम येडियुरप्पा यांनी केला. या आरोपाचे खंडन करतानाच मुख्यमंत्र्यांनी केवळ खोटे आरोप काय करता पुरावे द्या असे जणू आव्हानच दिले. त्यानंतर एक-दोन दिवसात राष्ट्रीय वाहिन्यांवरूनन विधान परिषद सदस्य गोविंदराजू यांच्या घरात सापडलेली डायरी उघड झाली. सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, दिग्विजयसिंग यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांची संक्षिप्त नावे आणि त्यांना पोचविलेली रक्कम याचा उल्लेख त्या डायरीत होता. या डायरीने काँग्रेसच्या अडचणी वाढताच लगेच सोशल मीडियावर भाजप नेते लेहरसिंग यांची डायरीही उघड झाली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आदी नेत्यांना येडियुरप्पा यांनी पैसे पोचवल्याचा संक्षिप्त उल्लेख या डायरीत आहे. गोविंदराजू यांच्या डायरीत 600 कोटी पोचवल्याचा तर लेहरसिंग यांच्या डायरीत 391 कोटी पोचवल्याचा उल्लेख आहे. सहारा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अशा डायरीतील नोंदी प्रमाण मानता येत नाहीत असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा डायरीमुळे कोणावर कारवाई होईल याची शक्मयता कमी असताना केवळ राजकीय वातावरण तापविण्यासाठी याचा वापर केला जात आहे. डायरी तुमच्याजवळ आहे तर कारवाई करा असे उघड आव्हानच सिद्धरामय्या यांनी दिले आहे तर भाजपने दोन्ही डायरीतील नेंदींच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

दीड महिन्यात 100 शेतकऱयांच्या आत्महत्या

दुष्काळामुळे शेतकऱयांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. केवळ दीड महिन्यात 100 शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. पिण्याचे पाणी आणि चाऱयाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अनेक खेडय़ांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. उन्हाळय़ात पशू-पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी बेळगावसह विविध भागात सोशल मीडियावर जागृती सुरू आहे. प्रत्येकाने आपल्या घराच्या छतावर भांडंभर पाणी ठेवा आणि पक्ष्यांचे जीव वाचवा असे संदेश व्हायरल झाले आहेत. अभयारण्यातील प्राणी संकुलालाही पाण्याची समस्या भेडसावत आहे. याचा विचार करून वन विभागाने कृत्रिम तळी तयार करून टँकरने त्या तळय़ात पाणी भरण्याचे उपक्रम हाती घेतला आहे. पाणी समस्येबरोबरच वन खात्याला वणव्याचा प्रश्नही डोकेदुखीचा ठरू लागला आहे. बंडीपूर अभयारण्यात वणव्यात होरपळून वनखात्याच्या कर्मचाऱयाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वन विभागाला जाग आली असली तरी वनकर्मचारी आणि अधिकाऱयांनी मात्र याचा धसकाच घेतला आहे. वनखात्यात 2500 हून अधिक कर्मचाऱयांची पदे रिक्त आहेत. जंगलातील गवत किंवा लाकडांनी पेट घेतला तर ती आग विझविण्यासाठी आवश्यक कर्मचारी आणि यंत्रणा वनविभागाकडे नाही. बंडीपूरच्या घटनेनंतर वनखात्याने राज्यात सर्वत्र हाय अलर्ट घोषित केले आहे. बंडीपूर, दांडेली, मंडय़ा, रामनगर, सकलेशपूर, दावणगेरी, चिक्कमंगळूर येथे जंगल परिसरात वणवा पेटला होता. गेल्या एक आठवडय़ापासून वणवा रोखण्यासाठी वनखात्याच्या कर्मचाऱयांची धडपड सुरू आहे. या वणव्याने वन्यजीवांनाही धोका निर्माण झाला आहे.

ए.सी.बी.चे राज्यभर छापे

यापूर्वी भ्रष्ट अधिकाऱयांवर लोकायुक्तांचे छापे पडायचे. आता लोकायुक्त संस्थेला बलहीन बनवून कर्नाटकात ए.सी.बी.ची स्थापना करण्यात आली आहे. ए.सी.बी.ने मंगळवारी बेळगाव, हुबळी, धारवाड, बेंगळूरसह दहा जिल्हय़ात छापे टाकले आहेत. हुबळी येथील वाणिज्य कर विभागाचे साहाय्यक आयुक्त करियप्पा कर्नाळ यांच्या घरातही तपासणी झाली. करियप्पा यांच्या घरात 7,000 किंमती साडय़ा सापडल्या आहेत. या साडय़ांची किंमतच दीड कोटीच्या घरात आहे. छाप्यात सहभागी झालेल्या अधिकाऱयांना तर धक्का बसलाच परंतु 7000 साडय़ा मोजून त्यांची नोंद करण्यासाठी त्यांना 7 ते 8 तास लागले. शेतकरी कष्टकरी व कामगारांना अंग झाकेल इतका कपडा मिळविण्यासाठी घाम गाळावा लागतो. इथे मात्र भ्रष्टाचाराच्या मार्गाने जमवलेल्या साडय़ा मोजण्यासाठी अधिकाऱयांना घाम सुटला.

भाऊबंदकी उफाळून येणार?

नंजनगूड आणि गुंडलूपेट विधानसभेसाठी होणाऱया पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे. काँग्रेस आणि निजदमधील असंतुष्ट नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. माजी मुख्यमंत्री कै. एस. बंगारप्पा यांचे चिरंजीव माजी मंत्री कुमार बंगारप्पा भाजपमध्ये दखल झाले आहेत. त्यांचे बंधू मधू बंगारप्पा सध्या निजदचे आमदार आहेत. बहीण गीता यांनी तर निजदच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. गीता या चित्रपट अभिनेते शिवराजकुमार यांच्या पत्नी आहेत.

डॉ. राजकुमार हयात असताना अनेकवेळा राजकीय प्रवेशाच्या संधी घरापर्यंत चालून आल्या तरीही राजकारणापासून ते दूर होते. त्यांच्या स्नुषा गेल्या निवडणुकीत सक्रिय राजकारणात येण्याचे प्रयत्न म्हणून आखडय़ात उतरल्या होत्या. बंगारप्पा यांच्या हयातीत कौटुंबिक कलहाने डोके वर काढले होते. कुमार बंगारप्पा हे वडिलांबरोबरच्या मतभेदांमुळे त्यांच्यापासून चार हात लांब होते. त्यांच्या निधनानंतरही ही भाऊबंदकी सुरूच आहे. कुमार बंगारप्पा यांना भाजपने आपले दरवाजे खुले केले त्यामुळे काँग्रेसने मधु बंगारप्पा यांना गळ घातली आहे. ते सख्ख्या भावाला धडा शिकविण्यासाठी काँग्रेसवासी होणार का हे लवकरच कळणार
आहे.