|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पेडणे तालुक्यात माकडतापाची भीती

पेडणे तालुक्यात माकडतापाची भीती 

प्रतिनिधी/ मोरजी

तोरसे, मोपा, इब्रामपूर या भागात आतापर्यंत सात माकडे मरून पडली असून त्यामुळे माकडतापाच्या भीतीने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. माकडतापाची शक्यता लक्षात घेऊन पर्यावरणमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी दि. 2 मार्च रोजी या परिसरात भेट देऊन अधिकाऱयांना महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी डॉक्टर योगेश कोरगावकर, जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, वनाधिकारी विलास गावस, अशोक घोगले आदी उपस्थित होते.

यावेळी पर्यावरण मंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी वन खात्याला सूचना करताना सांगितले की, सर्वात अगोदर वनखात्याच्या कर्मचाऱयांची तपासणी करावी, ज्या मेलेल्या माकडांची विल्हेवाट लावणाऱयांची आरोग्य तपासणी करावी तसेच वन खात्याने ही माकडे का मरतात? याचा अहवाल त्वरित देऊन उपाययोजना करायला हवी. आरोग्याची काळजी म्हणून आवश्यक लस किंवा औषधे उपलब्ध करावी तसेच या संदर्भात आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा सूचना केल्या.

दरम्यान, तुये सामुदायिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉक्टर उत्तम देसाई यांच्याकडे संपर्क साधला असता, आतापर्यंत एकही माकडतापाचा रुग्ण तालुक्यात सापडला नसल्याचे सांगून नागरिकांनी याविषयी अजिबात भीती बाळगू नये, असे सांगितले.