|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गिलानीच्या नातवाला सरकारी नोकरीमुळे वाद

गिलानीच्या नातवाला सरकारी नोकरीमुळे वाद 

नियमांना बाजूला ठेवत नियुक्तीचा आरोप : सरकारने दिले स्पष्टीकरण

वृत्तसंस्था/ श्रीनगर

नियमांना बाजूला सारून विघटनवादी नेता सय्यद अली शाह गिलानीच्या नातवाला सरकारी नोकरी देण्याप्रकरणी वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी पीडीपी-भाजप सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. गिलानीच्या नातवाच्या नियुक्तीत नियमांकडे डोळेझाक करण्यात आलेली नाही, नियुक्ती प्रक्रियेचे पूर्णपणे पालन करण्यात आल्याचे मेहबूबा मुफ्ती सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.

गिलानींचा नातू अनीस-उल-इस्लाम याला जम्मू-काश्मीर पर्यटन विभागाची सहयोगीय शाखा शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेंशन कॉम्पलेक्समध्ये संशोधन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सूत्रानुसार या नियुक्ती राज्य सरकारकडून अनेक नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. अनीला देण्यात आलेल्या या नोकरीचे वार्षिक वेतन 12 लाख रुपये आहे.

या नियुक्तीवरून मेहबूबा सरकारबरोबरच गिलानी देखील घेरले गेले आहेत. जे सरकारविरोधी आंदोलनाचा नेतृत्व करतात. परंतु सरकारी लाभ मिळविण्यास मात्र ते मागे राहत नाहीत. कायदा सर्वोच्च असून नियम सर्वांसाठी समान आहेत. जर कोणीही गडबड केली असेल तर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. दुसरीकडे हा प्रकार तरुणाईचे डोळे उघडणारा देखील आहे. गिलानी कशाप्रकारे तरुणांकडून दगडफेक करवित आहेत, शाळा उघडू देत नाहीत परंतु त्यांची मुले मात्र सरकारी नोकरी मिळवताहेत हे त्यांनी पाहावे असे भाजप आमदार रवींद्र रैना यांनी म्हटले.

जम्मू-काश्मीर सीआयडीच्या अहवालाच्या आधारावर राज्य पारपत्र कार्यालयाने 2009 साली अनीसला पारपत्र देण्यास नकार दिला, परंतु नंतर उच्च न्यायालयाच्या आदेशावर त्याला पारपत्र देण्यात आले. यानंतर एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी ब्रिटनमध्ये गेला होता. राज्य पर्यटन विभागाचा कार्यभार थेट मेहबूबा यांच्याकडे आहे. विभागाने या नियुक्तीसाठी अर्ज नियुक्ती मंडळ  किंवा लोकसेवा आयोगाजवळ पाठविला नाही, हाही प्रकार नियुक्ती प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे. गिलानींची नात एका एअरलाइन्समध्ये क्रू सदस्य म्हणून काम करते. गिलानींचा मुलगा नईम डॉक्टर असून तो आधी सरकारी आरोग्य विभागात काम करत होता.