|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » किनाऱयांवरील पर्यटकांच्या दिमतीला धावणार ‘जीव सुरक्षारक्षक’

किनाऱयांवरील पर्यटकांच्या दिमतीला धावणार ‘जीव सुरक्षारक्षक’ 

शासनाकडून 2016-17 वर्षासाठी निधीची तरतूद

रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग किनाऱयांवर सुविधा

प्रतिनिधी /रत्नागिरी

कोकण किनारपट्टीवरील पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाकडून ‘ग्रामीण पर्यटन’ अंतर्गंत समुद्रकिनारी भागात पर्यटक रिसॉर्ट, वॉटरस्पोर्ट उपक्रम सुरू करण्यासाठी प्रशासन स्तरावरून पावले उचलण्यात आली आहेत. रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्हय़ातील समुद्रकिनाऱयांच्या ठिकाणी सुविधा देत असताना त्या ठिकाणी मानधनावर ‘जीव सुरक्षारक्षक’ नियुक्ती करण्यासाठी शासनाने आदेश दिला आहे. पर्यटक व जीवसुरक्षा रक्षक नियुक्तीसाठी निधीची तरतूद केली आहे.

कोकण किनाऱयांच्या पर्यटनाची सफर करण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक भेटी देत असतात. रत्नागिरीसह, पालघर, सिंधुदुर्ग येथील समुद्रकिनारे नेहमीच पर्यटकांना खुणावतात. त्या ठिकाणी पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता शासनस्तरावरूनही आता विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्हय़ाची ओळख पर्यटनासाठी विशेषत्वाने होत आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून पर्यटकांचे लक्ष्य जिल्हय़ाकडे वेधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने निर्सगाची मोठी उधळण येथील प्रदेशावर झालेली आहे. पण त्या क्षेत्रांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांची नितांत गरज बनली आहे.

त्यामुळे सुट्टीच्या काळात राज्यभर व देशभरातील पर्यटकांची पावले आपोआप कोकणाकडे वळतात. समुद्रकिनाऱयावर पर्यटनाचा आस्वाद घेताना येथील खाडय़ांचा प्रदेशही साऱयांनाच मोहित करून सोडत आहे. त्यामुळे केरळ, गोवा येथील पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर आता वॉटरस्पोर्ट, स्पीडबोट या नव्या संकल्पनांना उभारी मिळाली आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी येथील स्थानिकांचा त्याकडे कल वाढू लागला आहे. रत्नागिरी जिल्हय़ातील 6 ठिकाणी वॉटरस्पोर्टस् उपक्रम पर्यटकांसाठी खुला झालेला आहे.

या ठिकाणी अनेक प्रसिध्द पर्यटस्थळे आहेत. पण त्या व्यतिरिक्त पर्यटकांच्या खास आकर्षणासाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांनी सज्ज असलेल्या पर्यटन प्रकल्पांची वानवा आहे. त्यासाठी आता जिल्हा नियोजनमधूनही विशेष निधीची तरतूद केली जात आहे. पाश्चात्य देशातील किनाऱयांच्या पार्श्वभूमीवर येथील किनारी पर्यटकांसाठी रिसॉर्टची उभारणी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनातील अधिकाऱयांचे पथकामार्फत किनाऱयांची पाहणी झाली होती. त्यानंतर पर्यटक व सांस्कृतिक विभागाने प्रत्येक समुद्रकिनाऱयास सप्टेंबर 2016 ते मार्च 2017 या कालावधीसाठी 1 लाख 34 हजाराचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून प्रत्येक किनाऱयावर 2 सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहे. त्यांना दरमहिना 6 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. तसेच आवश्यक उपाययोजनांसाठी वार्षिक 50 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानंतर पुढील वर्षापासून संबधित ग्रामपंचायतींनी स्वउत्पन्नातून या बाबींसाठी तरतूद करावी, असेही शासन आदेशात सांगण्यात आले आहे.

कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गंत सुविधा देण्यासाठी समावेश असलेले समुद्रकिनारे पुढीलप्रमाणेः

जिल्हा         समुद्रकिनारे

रत्नागिरी      भाटय़े

पालघर         माहिम

सिंधुदुर्ग        वायरी

Related posts: