|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » माकडताप नियंत्रणासाठी ठोस उपाय

माकडताप नियंत्रणासाठी ठोस उपाय 

बांदाबांदा सटमटवाडी भागात माकडतापाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर बंदरविकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथील आरोग्य केंद्राला भेट दिली. आतापर्यंत माकडतापामुळे चौघांचा बळी गेला आहे. आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी शक्य ते सर्व उपाय केले जातील, असे त्यांनी सांगितले.यावेळी अतुल काळसेकर, पं. स. सदस्य शीतल राऊळ, माजी सरपंच मंदार कल्याणकर, सरपंच बाळा आकेरकर, डॉ. सोडल, डॉ. सौदी, पंचायत समितीचे माजी सदस्य स्वप्नील नाईक उपस्थित होते.चव्हाण यांनी आरोग्य यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱया उपाययोजनांची माहिती घेतली. रुग्णांच्या व्यवस्थेबरोबरच जोखीमग्रस्त भागाचीही माहिती त्यांनी घेतली. यावेळी डॉ. पाटील यांनी माकडताप आजाराच्या तपासणीबाबत येत असलेल्या अडचणी सांगितल्या. मशिनरीचा प्रश्न उपस्थित झाला असता मशिनरी व इतर खर्चासाठी त्यांनी एक लाख रुपये दिले.

 बांदा-सटमटवाडी भागात माकडतापाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात झाला आहे. आतापर्यंत तीसहून अधिक रुग्णांना याचा त्रास झाला आहे. सटमटवाडी भागातील बहुतांश घरात या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच आरोग्य यंत्रणेमार्फत लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती. 130 हून अधिक रुग्णांना दुसऱया टप्प्यातील लसीकरण करण्यात आले.

 बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व त्यांचे सहकारी आरोग्य सहाय्यक एच. एच. खान, आरोग्य सहाय्यक ए. बी. डिसोजा, तुळसकर व महिला कर्मचारी जोखीमग्रस्त भागात सेवा देत आहे. मात्र, आजाराची तीव्रता मोठी असल्याने व त्यासाठी जिल्हास्तरावरून जेवढी दखल घ्यायला हवी ती न घेतल्याने आजार जोरदार फैलावत आहे.

 माकडांच्या मृत्यूच्या घटना सुरुच आहेत. या भागात मोठय़ा प्रमाणावर गोचिड सापडत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत फवारणी केली जात आहे. मात्र, पाळीव प्राण्यांमुळे व शेतकऱयांच्या सततच्या जंगल वावरामुळे गोचिड घरापर्यंत येत आहेत.

 आतापर्यंत आजाराची तीसपेक्षा अधिक रुग्णांना लागण झाली. तर खासगी रुग्णालयात औषधोपचार घेणाऱयांची संख्याही मोठी आहे. सध्या बांदा आरोग्य केंद्रात रुग्णांना दाखल करण्यासाठीही जागा नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱयांच्या आदेशावरून आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीतील दोन प्रभागात माकडताप रुग्णांसाठी कक्ष तयार करण्यात आला आहे. सोमवारपासून तेथे रुग्णांना दाखल केले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

   अन्यथा गंभीर स्थिती ओढवेल!

 पं. स. च्या माजी सदस्या सुलभा नाडकर्णी यांनी आजाराबाबत राज्य शासन व जिल्हा आरोग्य यंत्रणेसह वनविभाग गांभीर्याने घेत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. बांदा डोंगरपाल, गाळेल भागात शेकडो माकड मरत आहेत. गाळेल भागात तर गेल्या दोन दिवसात दहाहून अधिक माकडांचा मृत्यू झाला आहे. मात्र, वनाधिकाऱयांचे मोबाईल बंद असतात. हीच मृत माकडे कुत्रे खात असून हा आजार मनुष्य वस्तीत पसरत आहे. काजू बागेत जाणे जोखमीचे होऊन बसले आहे. त्यामुळ वनविभागाने माकडांचा बंदोबस्त करावा. अन्यथा गंभीर स्थिती ओढवेल, याकडे नाडकर्णी यांनी लक्ष वेधले.   

                        ग्रामस्थांची वनविभागावर नाराजी

 माकडतापाबाबत बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेल्या उपाययोजनांबाबत ग्रामस्थांत कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. मात्र, वरिष्ठ पातळीवरून या आजाराबाबत झालेला दुर्लक्ष आणि वनविभागाच्या दुर्लक्षामुळे आजार फोफावत चालल्याचे नागरिकांचे मत आहे. आतापर्यंत 30 हून अधिक रुग्णांना माकडतापाची लागण झाली आहे. काहीजण बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काहीजण बांबोळी-गोवा येथे उपचार घेत आहेत. दीड वर्षाच्या मुलीलाही आजाराची लागण झाली होती. मात्र, बांबोळी येथे उपचार घेतल्यानंतर ती मुलगी आता बरी झाली आहे.