|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चोरीच्या प्रकारांनी बाजारपेठेत खळबळ

चोरीच्या प्रकारांनी बाजारपेठेत खळबळ 

झेंडा चौक येथे किराणा दुकान तर गणपत गल्ली येथील सराफी दुकान फोडले

प्रतिनिधी/ बेळगाव

झेंडा चौक कांदा मार्केट परिसरातील एक होलसेल किराणा दुकान व गणपत गल्ली येथील एक सराफी दुकान फोडण्यात आले आहे. शनिवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून या घटनांनी बाजारपेठेत खळबळ माजली आहे. या दोन्ही घटनांमागे एकच टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे.

झेंडा चौक कांदा मार्केट येथील मे वामनराव सटवाप्पा कलघटगी या होलसेल किराणा दुकानात चोरीचा प्रयत्न झाला आहे. चिल्लर रक्कम वगळता चोरटय़ांच्या हाती काहीच लागले नसले तरी खिडकी, दरवाजांचे नुकसान करण्यात आले आहे. चोरीचा प्रकार उघडकीस येताच विकास कलघटगी यांनी मार्केट पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सीमानी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. दुकानासमोरील एका टेलिफोन खांबावरून छतावर चढून खिडकीचे गज तोडून चोरटय़ांनी दुकानात प्रवेश केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर आतील भक्कम दरवाजाही फोडण्यात आला आहे. 120 वर्षांपूर्वीच्या या जुन्या इमारतीत किमती ऐवजासाठी शोधाशोध करण्यात आली आहे.

यापूर्वीही तीन वेळा चोरीची घटना

तिजोरीच्या चाव्या त्यालाच होत्या. त्यामुळे तिजोरीत रोकड शोधून इतरत्र आणखी काही मिळते का? यासाठी चोरटय़ांनी शोधशोध केली आहे. या दुकानासमोरील हायमास्ट दिवा बंद पडला आहे. तो सुरू करावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. गस्तीवरील पोलिसांसाठी एक पॉईंट बुक होते. ते बुकही गायब झाले आहे. यापूर्वीही तीन वेळा या दुकानात चोरीची घटना घडली होती.

चिल्लर रक्कम, चांदीचे साहित्य लंपास

दुसरी घटना गणपत गल्ली येथे घडली आहे. सोनाली ज्वेलर्स या सराफी दुकानासमोरील टेलिफोन खांबावरून चोरटय़ांनी पहिल्या मजल्यावर चढून दरवाजा फोडून दुकानात प्रवेश मिळविला. या दुकानातही चिल्लर रक्कम व चांदीचे काही साहित्य लांबविण्यात आले आहे. सराफी दुकानातील लॉकर उघडता आले नाही म्हणून चोरटय़ांनी तेथून पळ काढला आहे.

हा प्रकार उघडकीस येताच नामदेव काकडे यांनी खडेबाजार पोलिसांना माहिती दिली. एसीपी जयकुमार, पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी, कॅम्पचे पोलीस निरीक्षक सुदर्शन पट्टणकुडे आदी अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या दोन्ही चोरी प्रकरणांची नोंद रात्री उशिरापर्यंत मार्केट व खडेबाजार पोलीस स्थानकात झाली नव्हती. भर बाजारपेठेत झालेल्या या चोऱयांमुळे व्यापाऱयांत खळबळ माजली असून गस्त वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे. 

 

Related posts: