|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » leadingnews » शेतकऱयांसाठी योग्यवेळी कर्जमाफी जाहीर करणार : मुख्यमंत्री

शेतकऱयांसाठी योग्यवेळी कर्जमाफी जाहीर करणार : मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यातील शेतकऱयांच्या बाजूने आमचे सरकार आहे, आमचा कर्जमाफीला विरोध नाही, शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी केंद्र सरकारकडून मदत मागणार असून योग्यवेळी शेतकऱयांसाठी कर्जमाफी जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि इतर मंत्री उपस्थित होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहात 27 विधेयके मांडली जाणार आहे. या अधिवेशनात शेतकऱयांच्या हिताचे निर्णय घेतले जाणार आहेत. आत्तापर्यंत 17 लाख क्विंटल तूर हमी भावाने खरेदी करण्यात आली आहे. तसेच शेतकऱयांना जलद गतीने कर्ज पुरवठा केला जात आहे. त्यांना वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी या अधिवेशनात प्रयत्न करणार आहे.

यावेळी त्यांनी विरोधकांनीही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, आम्हाला पूर्ण समर्थन मिळाल्याने विरोधकांची घोर निराशा झाली आहे. त्यांना कळत नाही की आता करायचे काय. सध्या विरोधकांकडे मुद्देच नाहीत. दरम्यान, येत्या 18 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.