|Monday, July 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » प्रकृतीला संस्कृती बनविणारे माध्यम म्हणजे शिक्षण

प्रकृतीला संस्कृती बनविणारे माध्यम म्हणजे शिक्षण 

प्रतिनिधी / बेळगाव

दगड म्हणजे प्रकृती आणि त्यातून निर्माण होणारे शिल्प म्हणजे संस्कृती होय. माणसाचं जीवनही तसंच आहे. त्याचे शिल्प घडवायचे असल्यास शिक्षण महत्त्वाचे ठरते. प्रकृतीचे संस्कृतीमध्ये रुपांतरण करण्याचे माध्यम म्हणजे शिक्षण आहे. यात शिक्षकाची भूमिका महत्त्वाची ठरते, असे उद्गार आहेत ज्ये÷ शिक्षणतज्ञ गुरुराज करजगी यांचे.

बीईएस संचालित उषाताई गोगटे कन्या शाळेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक आणि उषाताई गोगटे यांचे चिरंजीव अरविंद गोगटे, पोलीस आयुक्त टी. जी. कृष्णभट्ट, संस्थेचे अध्यक्ष के. एन. पै, सचिव एस. एन. शिवणगी, संचालक अविनाश पोतदार व सुधीर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्याला मराठी चांगलं कळतं पण बोलता येत नाही. आपली मातृभाषा मराठी. पुढे कन्नडशी जोडला गेलो, मराठी ही जगभरातील प्रेंच आहे. आपले करजगी हे आडनाव केवळ महाराष्ट्रातच चांगल्या पद्धतीने उच्चारले जाते. इतर ठिकाणी नाही, असे सांगत गुरुराज करजगी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. प्रसिद्ध हास्य अभिनेता चार्ली चॅप्लीन याच्या एका चित्रफितीतील प्रसंग सांगताना, शिक्षणाच्या वाटेवरील मी एक भिकारी आहे, असे करजगी म्हणाले. मी कोणताही तज्ञ नाही, तसेच तुम्हाला मार्गदर्शन करायला आलो नाही. तुमच्याकडून जे काही शिकायला मिळेल ते शिकायला आलो आहे, असे ते म्हणाले.

सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱया संस्थेचा गौरव आहे. मात्र 50 वर्षे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात मोठे असले तरी संस्थेच्या जीवनात ती अल्प आहेत. एखादी संस्था 50-100 वर्षांसाठी नसतेच. तिने हजारो वर्षे पूर्ण करायला हवीत. यासाठी उषाताई गोगटे शाळेनेही हजारो वर्षांची परंपरा निर्माण करावी, अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या. जगभरातील क्रमांक एकचे विद्यापीठ असणाऱया केंब्रिज विद्यापीठाने  800 वर्षे पूर्ण केली. 800 व्या वर्षीही जगभरात आपला अव्वल क्रमांक कसा काय टिकविला? हा प्रश्न होता. यावर संशोधन केले असता तेथे शिकविणाऱया मंडळींपैकी 43 जण नोबेल पुरस्कार विजेते आढळले. हेच त्याचे प्रमुख कारण आहे, याचा त्यांनी उल्लेख केला.

संस्था छान असतात. त्या उत्तमही असतात. त्यांना अत्युत्तम बनविण्याचे काम तेथील कर्मचारी करतात. शाळा हे मंदिर मानून काम करणारे शिक्षकच शाळेतील शिक्षणाचा दर्जा ठरवितात. शिक्षकांनी स्वतःला बदलायला हवे. विद्यार्थ्यांना केवळ मार्क्सवादी न बनविता शिक्षणवादी बनविणे महत्त्वाचे आहे. सीईटी परीक्षेत राज्यभरात अव्वल आलेल्या 20 विद्यार्थ्यांना दोन महिन्यांनंतर पुन्हा तीच प्रश्नपत्रिका सोडवायला दिली असता ते सोडवू शकले नाहीत. यावरून आपण विद्यार्थ्यांना हमाल तर बनवत नाही आहोत ना? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एका ठिकाणावरून सामान उचलायचे आणि प्लॅटफॉर्मवर सोडून द्यायचे आणि विसरून टाकायचे, हीच विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे का? याकडे लक्ष वेधत फक्त परीक्षेसाठी तयारी करण्याची मानसिकता बदलायला हवी, असे करजगी म्हणाले.

एका विद्यापीठाच्या नोबेल विजेत्या प्राध्यापकाच्या जीवनात दु:खद प्रसंग ओढवला. त्याची पत्नी व एकुलती मुलगी अपघातात दगावले. त्यानंतर तब्बल दोन वर्षे प्राध्यापक दु:खात होते. त्या विद्यापीठाने प्राध्यापकांना एक पत्र पाठविले. तुमच्या जीवनात वाईट घडले आहे, याची आम्हाला कल्पना आहे. मात्र दोन वर्षात तुम्ही इकॉनॉमिक्सला काहीच देऊ शकला नाहीत, हे ही दुर्दैव आहे. यामुळे नवे काही तरी संशोधन करून स्वतःला सिद्ध करेतोवर कृपया कामाबाहेर रहा, अशी विनंती त्या विद्यापीठाने केली होती. आपल्याकडे पद्मश्री किंवा ज्ञानपीठ मिळाले की काही माणसे केवळ सत्कारापुरती जिवंत राहतात. त्यानंतर आपली जबाबदारी संपली असे त्यांचे वर्तन असते. मात्र पुरस्कार मिळाल्यावर जबाबदारी वाढते याचे भान त्यांनी बाळगण्याची गरज आहे, असे करजगी यांनी सांगितले.

चांगला शिक्षक झाडाखालीही वर्ग रंगवू शकतो आणि आळशी शिक्षक वातानुकूलित वर्गातही विद्यार्थ्यांना झोपवू शकतो. यासाठी शिक्षकांनी स्वतःला सतत घडविले पाहिजे. प्राचार्यांनी शिक्षकांच्या प्रगतीचा आढावा प्रत्येक तीन महिन्यांतून एकदा घ्यायला हवा. आजचे जग झपाटय़ाने बदलत चालले आहे, याकडे लक्ष द्या. मुळे कापून मुलांचे बोन्साय बनवायचे की डेरेदार वृक्ष हे आपण ठरवायला हवे, असा त्यांनी उल्लेख केला.

प्रारंभी 50 वर्षांपासून चालत आलेल्या प्रार्थनेने सुरुवात झाली. शाळेच्या स्थापनेपासूनच्या महत्त्वाच्या घटनांची छायाचित्रफीत दाखविण्यात आली. प्राचार्य मादार यांनी स्वागत केले. एस. एन. शिवणगी यांनी प्रास्ताविक केल्यानंतर मान्यवरांचा परिचय व सत्कार करण्यात आला. दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. सुवर्ण महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले.

यावेळी प्रमुख पाहुणे अरविंद गोगटे यांनी उषाताई गोगटेंचा मुलगा म्हणून आज अभिमानाचा दिवस आहे. वेगवेगळय़ा देवतांची मंदिरे असतात. शाळा ही शिक्षणाची मंदिरे आहेत. बीईएस या संस्थेने अतिशय कार्यक्षमरीत्या शाळा वाढविली आहे. ज्ञान प्रसारणाच्या या कामाबद्दल गोगटे कुटुंबीयांच्यावतीने त्यांना धन्यवाद देतो, असे उद्गार काढले. सेवा हे उद्दिष्ट ठेवून व्यापारी दृष्टिकोन न ठेवता काम सुरू आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

Related posts: