|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘प्रवास श्यामची आई ते आजची आई’चा

‘प्रवास श्यामची आई ते आजची आई’चा 

मालवण : साने गुरुजींची आई यशदा साने यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बॅ. नाथ पै सेवांगण संचलित कौटुंबिक सल्ला केंद्र मालवणतर्फे ‘प्रवास श्यामची आई ते आजची आई’ या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. श्यामच्या आईने श्यामला दिलेले संस्काराचे महत्व नव्या पिढीच्या पाल्यांना कळावे तसेच जबाबदार पालकत्वाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न या लघुपटाच्या माध्यमातून केला असल्याची माहिती लघुपटाच्या लेखन व मांडणीची जबाबदारी सांभाळणाऱया कौटुंबिक सल्ला केंद्राच्या संचालिका चारुशिला देऊलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नगरसेवक नितीन वाळके, अरविंद सराफ, सुहास ओरोसकर, मनोज गिरकर, शनिता मसुरकर आदी उपस्थित होते.

लघुपटाच्या निर्मितीविषयी माहिती देताना चारुशिला देऊलकर म्हणाल्या, श्यामची आई या पुस्तकरुपाने साने गुरुजींवर त्यांच्या आईने कसे संस्कार केले हे सर्वांपर्यंत पोहोचले. परंतु आजची ही नवीन पिढी आहे. त्यांच्यापर्यंत ‘श्यामची आई’ पोहोचणे गरजेचे आहे. कौटुंबिक सल्ला केंद्रात काम करताना आजचे पाल्य व त्यांच्या मुलांपर्यंत श्यामच्या आईचे संस्कार पोहोचविणे जास्त गरजेचे वाटले. म्हणूनच आजच्या पिढीपर्यंत थेट पोहोचण्यासाठी ‘प्रवास श्यामची आई ते आजची आई’ लघुपट बनविण्याचा विचार पुढे आला. साने गुरुजींच्या जीवनात घडणाऱया छोटय़ा प्रसंगातूनही त्यांच्या आईने त्यांना संस्कारित बनविले. आजच्या आईने श्यामच्या आईचा आदर्श घेणे गरजेचे असल्याचे लघुपटातून मांडण्यात आले आहे.

त्या म्हणाल्या, वीस मिनिटांचा हा लघुपट आहे. हडी कोतेवाडा येथील रिना आचरेकर यांच्या घरात या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. शनिता मसुरकर यांनी श्यामच्या आईची भूमिका साकारली आहे. लघुपटाचे डबिंग संदीप माने यांनी केले आहे. संकलन समीर म्हाडगूत व प्रितम परब यांनी केले आहे. वेशभूषा सुनीता जाधव व लक्ष्मीकांत खोबरेकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

नितीन वाळके म्हणाले, येथील मामा वरेरकर नाटय़गृह येथे होणाऱया 8 रोजी महिला दिन कार्यक्रमात या लघुपटाच्या प्रिमियर शोचे आयोजन करण्यात आले आहे. हा लघुपट पाहण्यासाठी सर्व महिलांनी यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. प्रिमियर शो नंतर हा लघुपट यूटय़ुबच्या माध्यामातून संपूर्ण महाराष्ट्रात दाखविला जाणार आहे. जेणेकरून आजच्या नवीन पिढीपर्यंत हा लघुपट पोहोचावा.

Related posts: