|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वेंगुर्ले तालुक्यात राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांची अनामत जप्त

वेंगुर्ले तालुक्यात राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांची अनामत जप्त 

वेंगुर्ले : नुकत्याच झालेल्या जि. प., व पं. स. निवडणुकीत वेंगुर्ले तालुक्यातील 12 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत पं. स. या दहापैकी सहा जागा जिंकणाऱया राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच्या सर्व सहाही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. तसेच जि. प. चे माजी आरोग्य व शिक्षण समिती सभापती विकास राजाराम गवंडे व वेंगुर्ले पं. स. चे माजी सभापती अभिषेक चमणकर यांचीही अनामत जप्त झाली आहे.

 या निवडणुकीत शिवसेना व काँग्रेसने सर्वच्या सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. भाजपने म्हापण व परुळे पं. स. मतदारसंघ वगळता इतर 13 ठिकाणी उमेदवार उभे केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने जि. प. च्या दोन जागांसाठी, तर पं. स. च्या चार जागांसाठी असे एकूण सहा उमेदवार उभे केले होते. तर आठ अपक्ष निवडणूक रिंगणात होते. यातील भाजपच्या एका, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहाही उमेदवारांचे व आठ अपक्षांपैकी पाच अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांची अनामत जप्त

मागील निवडणुकीत जि. प. च्या पाचपैकी तीन व पं. स. च्या दहापैकी सहा जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने वेंगुर्ले पं. स. वर सत्ता काबीज केली होती. वेंगुर्ले न. प. च्या सतरा पैकी बारा जागा जिंकत राष्ट्रवादी सत्तेवर आली होती. या निवडणुकीत  तुळस जि. प. मतदारसंघातून तुळसचे माजी सरपंच संदीप जगन्नाथ पेडणेकर, उभादांडा जि. प. मतदारसंघातून जि. प. माजी सदस्य मकरंद महादेव परब, मातोंड पं. स. मधून विशाल बागायतकर, उभादांडा पं. स. चे माजी सरपंच रामेश्वरी राधाकृष्ण गवंडे, आसोली पं. स. मधून अनिल महादेव तारी, रेडी पं. स. मधून नंदकुमार नकुल मांजरेकर असे एकूण सहा उमेदवार उभे केले होते. या सहाही उमेदवारांना एकूण मतांच्या एक अष्टमांश (नोटा मते वगळून) मते न मिळाल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. राजकीय पक्षाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होण्याची ही जिल्हय़ातील पहिली घटना.

दोन सभापतींचीही अनामत जप्त

या निवडणुकीत जि. प. चे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती विकास राजाराम गवंडे हे काँग्रेसला रामराम करून भाजपमधून म्हापण जि. प. मतदारसंघातून उभे राहिले होते. त्यांना केवळ 516 मते पडल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे, तर वेंगुर्ले पं. स. चे माजी सभापती व मावळते सदस्य अभिषेक चमणकर यांचीही अनामत रक्कम जप्त झाली आहे. त्यांना केवळ 678 मते मिळाली. ते अपक्ष म्हणून निवडणुकीस उभे होते.

याशिवाय रेडी जि. प. मतदारसंघातून गोपाळ रामकृष्ण बटा, नवसो दिगंबर राऊत, तुळस. पं. स. मतदारसंघातून दत्ताराम माळकर, शिरोडा पं. स. मतदारसंघातून धनंजय परब या अपक्ष उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे.

 

Related posts: