|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जीवन प्राधिकरणचे कर्मचारी बेमुदत संपावर

जीवन प्राधिकरणचे कर्मचारी बेमुदत संपावर 

ओरोस : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱयांचे वेतन व निवृत्ती वेतनाचे दायित्व महाराष्ट्र शासनाने स्वीकारावे. या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीच्यावतीने या विभागाच्या कर्मचाऱयांनी बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला आहे. दरम्यान, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणेही धरले आहे.

  महामंडळाच्या धर्तीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱयांचे वेतन, निवृत्ती वेतन व भत्ते देण्याबाबतची मागणी तीन महिन्यांत मान्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर 2015 मध्ये देऊनही त्याची अद्याप पूर्तता न झाल्याने प्राधिकरणच्या कर्मचाऱयांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 1 तारीखपासून जिह्यातील या विभागाचे कर्मचारी काळ्य़ा फिती लावून काम करीत असून आता त्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या उत्पन्नात वित्तीय तूट येत असल्याने कर्मचाऱयांच्या सेवा सवलती शासनाकडून नाकारल्या जात आहेत. कृष्णा खार, विदर्भ, तापी, कोकण, गोदावरी, मराठवाडा या पाच महामंडळांची विशेष बाब म्हणून शासनाने वेतन व भत्त्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱयांच्या वेतन, निवृत्ती वेतन व भत्यांची जबाबदारी शासनाने स्वीकारावी, अशी मागणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीने शासनाकडे केली होती. त्यानुसार याबाबतचे दायित्व शासनाने स्वीकारावे, अशा आशयाची टिप्पणीही तयार झाली होती. मात्र ती अद्याप मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आलेली नाही.

ती मंत्रिमंडळासमोर ठेवावी, वेतनाचा व अन्य भत्त्यांचा प्रश्न मिटवावा, यासाठी या कर्मचाऱयांनी 8 डिसें   बर 2015 रोजी आंदोलन छेडले होते. यावेळी तीन महिन्यात याबाबतचा तोडगा काढला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, अद्याप त्याची पूर्तता झाली नसल्याने या कर्मचाऱयांनी संघटनेच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन उभारले आहे.

1 मार्चपासून या आंदोलनाला सुरुवात झाली असून 4 मार्चपर्यंत काळय़ा फिती लावून काम केले. 5 मार्चपासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संप पुकारला आहे. तसेच संप कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले जाणार आहे, अशी माहिती संघटनेकडून देण्यात आली.