|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » चौथ्या खेटय़ासाठी भाविकांची जोतिबा डोंगरावर अलोट गर्दी

चौथ्या खेटय़ासाठी भाविकांची जोतिबा डोंगरावर अलोट गर्दी 

विनोद चिखलकर/ जोतिबा डोंगर

दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात व भक्तीमय वातावरणात ‘जोतिबाचा चौथा खेटा’ लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ‘श्री’ची पुजा, धार्मिक विधी व पुरणपोळीचा नैवेद्य करुन ‘श्री’स नारळ, दवणा व गुलाल खोबरे अर्पण करून ‘श्री’चे दर्शन घेण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली होती.

महाराष्टा^सह कर्नाटक तसेच कोल्हापूरसह जोतिबाच्या दर्शनाला दिवसभरात लाखेंच्यावरती भाविकांनी गर्दी केली होती. दर्शनासाठी दिवसभर चार ते पाच पदरी रांगा लागल्या होत्या. दरम्यान मागील तीन खेटय़ापेक्षा चौथ्या खेटय़ाला पहाटे पोहाळे कुशिरे डोंगर परिसर व गायमुख परिसराच्या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या परिसरात चांगभलंचा अखंड गजर चालू होता. मुख्य रस्ता, महाद्वार, जोतिबा मंदिर परिसर, दक्षिण दरवाजा, नवीन वसाहत, यमाई मंदिर परिसरात, भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. खेटे करणाऱया बऱयाचशा भाविक भक्तांनी चौथ्या खेटय़ालाच पुजाऱयाच्या घरी जाऊन ‘श्री’स अभिषेक, पोशाख, धार्मिक विधी व पूरणपोळीचा नैवेद्य केला. पारंपरिक पद्धतीने चाललेल्या खेटय़ाची सांगता पुढील पाचव्या खेटय़ाला आपआपल्या पुजाऱयाच्या घरी नैवेद्य करून नारळ देऊन पूरणपोळीचा प्रसाद घेऊन केला जाईल.

दरम्यान पहाटे 4 वाजता घंटानाद करून मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर श्री जोतिबाची पाद्यपुजा, काकड आरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी श्रींबरोबर नंदी, महादेव यमाई, चोपडाई, काळभैरव, रामलिंग, दत्त या देवांना महाभिषेक घालून अलंकारिक आकर्षक महापुजा बांधण्यात आली. त्यानंतर जोतिबा मंदिरात केदार स्त्राsत, केदारकवच व केदार महिमा या सुक्ताचे पठण करण्यात आले. त्यानंतर धुपारती करून महानैवेद्य दाखवण्यात आला.

रात्री साडे आठ वाजता उंट, घोडा, वाजंत्री, कंचाळवादक, देवदेवक, हुद्देवाले, म्हालदार, डवरी, ढोली व ‘श्रीं’चे पुजारी तसेच देवस्थान समिती व सिंधींचा ट्रस्ट समिती यांचे अधिकारी व कर्मचारी व भाविक भक्तगण असा मोठा लवाजमा सोहळा ‘पालखी’ सोहळय़ासाठी निघाला. पालखी मंदिर प्रदक्षिणा घालून पालखी सदरेवर बसवण्यात आली. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. यावेळी डवरी यांचे गीते व ढोली यांचे ओव्या व झुलवे म्हणण्यात आले. त्यानंतर मानपान करुन तोफेची सलामी देऊन पालखी मंडपात आणण्यात आली व उत्सवमूर्ती श्रींच्या मंदिरात नेण्यात आली. यावेळी चांगभलंचा गजर व गुलाल खोबऱयाची मोठी उधळण करण्यात आली.