|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ‘पाक’ची कबुली

‘पाक’ची कबुली 

मुंबईवरील 26 नोव्हेंबर 2008 मधील हल्ल्यामागे पाकिस्तानातील एका दहशतवादी संघटनेचा हात असल्याची कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महमूद अली दुर्राणी यांनी दिल्याने पाकिस्तानाचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. ही कबुली भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बाब असून, आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकला एकटे पाडण्यासाठी याचा आपल्याला धूर्तपणे उपयोग करून घ्यावा लागेल. 2008 मध्ये समुद्रमार्गे प्रचंड शस्त्रसाठय़ानिशी घुसलेल्या दहा दहशतवाद्यांनी अवघ्या मुंबईला वेठीस धरले. या दहशतवादी हल्ल्यात अनेक नागरिकांसह पोलीस अधिकारी शहीद झाले. दहा पैकी अजमल कसाब या दहशतवाद्यास पकडण्यास यश आल्याने हा हल्ला पाकिस्तानमधून झाल्याला वास्तविक तेव्हाच पुष्टी मिळाली होती. मात्र, पाकिस्तान ही बाब मान्य करण्यास तयार नव्हता. जमात उद दावा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याच्यामार्फत हा हल्ला घडवून आणल्यासंदर्भात भारताकडून पाकिस्तानला वेळोवेळी अनेक पुरावेदेखील देण्यात आले. दुसरीकडे दहशतवादी हल्ल्यांबाबत अटक करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली यानेही मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यामागे पाकिस्तानच असल्याचा गौप्यस्फोट केला होता. तथापि, हे सगळे मान्य करेल, तो पाकिस्तान कसला? पाकिस्तानने आपल्यावरील सगळे आरोप कायम फेटाळून लावताना नेहमीच साळसूदपणाचाच आव आणला आहे. गुरुदासपूर व पठाणकोटमधील हल्ले, सीमेवरील घुसखोरी या माध्यमातून भारताला कसा आणि किती उपद्रव देता येईल, यावरच या शेजारी राष्ट्राने नेहमी भर दिलेला दिसतो. मात्र, आजवरच्या पाकच्या सर्वच हल्ल्यांना पुरून उरलेल्या भारतीय सेनेने सर्जिकल स्ट्राईकद्वारे नापाक इरादे उधळले आहेत. आता दुर्राणी यांच्या विधानामुळे बुरख्यामागचा पाकिस्तानचा विद्रूप चेहरा उघडा पडला आहे. असे असले, तरी या हल्ल्यात पाकिस्तान सरकारचा अजिबात सहभाग नव्हता, अशी पुस्तीही हे महाशय जोडतात. हे काहीसे अनाकलनीय ठरते. खरेतर पाकिस्तान वा आयएसआयसारख्या गुप्तचर संस्थांनीच तेथील दहशतवादी संघटनांना खतपाणी घालण्याचे काम केले आहे. घुसखोरीकरिता शस्त्रास्त्रांपासून ते अर्थपुरवठय़ापर्यंत सगळय़ा गोष्टी या राजकीय वरदहस्तामुळेच शक्य झाल्या आहेत. हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे या आघाडीवर पाकिस्तान सरकार पूर्णत: निर्दोष असेल, यावर कसा विश्वास ठेवायचा? मागील वर्षी मार्चमध्येच गुजरातमध्ये दहशतवादी घुसल्याबाबत पाकनेच भारतीय गुप्तचर विभागाला धोक्याची सूचना दिली होती. अर्थात ती निव्वळ एक चालच होती. आपणही दहशतवादाचे बळी ठरलो आहोत, देशातील अतिरेकी संघटना आपल्या हाताबाहेर गेल्या आहेत, अशी हतबलता हा देश नेहमीच व्यक्त करीत असतो. प्रत्यक्षात इतरांच्या सीमाप्रदेशात लुडबूड करणाऱया या देशाने दहशतवादाविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली का, असा प्रश्न केला, तर नकारार्थीच उत्तर मिळते. म्हणूनच अमेरिकेनेही या देशाला अजिबात विश्वासात न घेता त्यांच्या भूमीत लपलेल्या ओसामा बिन लादेनचा अगदी नियोजनबद्धपणे खातमा केला, हा इतिहास फार जुना नाही. आता अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली आहे. दहशतवादाबाबतची ट्रम्प यांची भूमिका सर्वश्रुत आहे. आज ना उद्या पाकिस्तानवरही त्यांची वक्रदृष्टी पडू शकते. हे पाकने ताडले असावे. त्यामुळेच आता वेगळय़ा पद्धतीने वागण्याचे त्यांनी ठरवलेले दिसते. हाफीज याला दहशतवादी कारवायांच्या आरोपांखाली स्थानबद्धतेत ठेवणे, हा त्याचाच भाग म्हणता येईल. दुर्राणी हे हाफिजवर अधिक कडक कारवाईची भाषा करीत आहेत. हाफिज काय किंवा दाऊद काय, त्यांच्यावरील किमान कारवाईची भूमिका हा राजनैतिकदृष्टय़ा आपला विजयच म्हणावा लागेल. अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चाणक्यनीतीचेही हे यश म्हटले पाहिजे. सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून पाकला जशास तसे उत्तर देऊन भारत थांबलेला नाही. तर पाकिस्तानसोबत वाटाघाटी थांबविण्याच्या दृष्टीनेही पावले उचलण्यात आली. इतकेच नव्हे, तर सिंधु जल करारानुसार आपल्या वाटय़ाच्या संपूर्ण पाण्याचा वापर करण्याबाबतही भूमिका घेण्याचा ताठरपणा दाखविण्यात आला आहे. दुसऱया बाजूला भारताने सौदी, अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिरातीसह अनेक देशांशी मैत्र प्रस्थापित केले आहे. मोदी यांच्या जगभ्रमंतीचाही यात महत्त्वाचा वाटा आहे. भविष्यात ही मैत्री अधिक घट्ट करण्यासाठीही आपल्याला सजग राहायला हवे. दुसऱया बाजूला महासत्ता अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील पूर्वापार स्नेहभावालाही ओहोटी लागल्याचे दिसत आहे. ट्रम्पयुगाला सुरुवात झाल्याने पाकिस्तानच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. या सगळय़ाच बाबींचा या ना त्या माध्यमातून पाकिस्तानवर दबाव निर्माण होत आहे. या दडपणातूनच त्यांच्याकडून पुढेही वरपांगी का होईना काही आश्चर्यकारक, धक्कादायक पावले पडू शकतात. स्वाभाविकच त्यावर समाधान मानून चालणार नाही. पाकच्या भूमिकेत खरेपणा किती व उपचाराचा भाग किती, हे मुळात जाणून घेतले पाहिजे. चर्चेतून गुंतवून ठेवायचे, बससेवा सुरू करायच्या, हवामानाचा फायदा घेऊन घुसखोऱया करायच्या, सीमेवर आकळीक करायची, अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी बनावट नोटांचे जाळे विणायचे आणि हेरगिरी करीत भारतकेंद्री धोरण ठेवायचे, हे पाकिस्तानचे जुने उद्योग आहेत. यात दोन देशांच्या निर्मितीपासून तीळमात्र बदल झालेला नाही. या सगळय़ा दुष्टाव्यातून मुक्त होऊन हा देश शहाण्यासारखा वागेल, अशी अपेक्षा करणे भाबडेपणाचे ठरेल. त्यांच्या सांप्रत वागण्यालाही ढोंगीपणाचाच दर्प अधिक येतो. त्यामुळे यापुढेही त्यांच्या काव्यापासून सावध राहावे लागेल. भारताच्या डावपेचांना यश येणे, हे सुचिन्हच आहे. यापुढेही केवळ सामरिकदृष्टय़ा नव्हे; तर राजनैतिक पातळीवरही पाकचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे.