|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » भारत बनविणार जगातील सर्वात शक्तिशाली ‘सुपर कॉम्प्युटर’

भारत बनविणार जगातील सर्वात शक्तिशाली ‘सुपर कॉम्प्युटर’ 

सिंधुदुर्ग : 20-20 पर्यंत भारताला जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर बनवायचा असून त्यासाठी केंद्र शासनाने तब्बल 4500 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. एका सेकंदाला ‘एक्झा स्केल’ म्हणजेच अंकावर अठरा शून्ये एवढी गणितीय समिकरणे अचूकपणे सोडवू शकेल एवढय़ा महाक्षमतेचा सुपरकॉम्प्युटर बनवायचे आव्हान भारतीय संगणक शास्त्रज्ञांनी स्वीकारल्याचे भारताच्या ‘परम महासंगणका’चे जनक व जगप्रसिद्ध नालंदा विश्वविद्यालयाचे कुलगुरु डॉ. विजय भटकर यांनी स्पष्ट केले.

भारतीय संगणक मिशनचे प्रमुख असलेले डॉ. भटकर हे नुकतेच कृषी महोत्सवाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग दौऱयावर आले होते. यावेळी त्यांनी खास तरुण भारतसाठी दिलेल्या विशेष मुलाखतीत वरील माहिती दिली.

2020 पर्यंत भारत करणार जगातील  सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटरची निर्मिती

भारताच्या या भविष्यातील सुपरकॉम्प्युटरची निर्मिती आणि त्या पाठीमागील पार्श्वभूमीबाबत बोलताना डॉ. भटकर म्हणाले, भारताने आता जागतिक महासत्तेच्या स्पर्धेत उडी घेत बरीच आघाडी मिळविली आहे. भारतीय अर्थव्यवस्था आता जगातील चीन, अमेरिकेपाठोपाठ जगातील तिसऱया क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. 2040 पर्यंत आम्ही वरील दोन्ही देशांना मागे टाकून प्रथम क्रमांकावर असणार आहोत. तत्पूर्वी आम्हाला बरीच प्रगती करावी लागणार आहे. कृषी, तंत्रज्ञान, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण, संशोधन, व्यापार, उत्पादन या सर्व क्षेत्रात भारताला आघाडी घ्यावी लागणार आहे. हे सर्व साधायचे असेल, तर या प्रत्येक गोष्टीत अत्यावश्यक असणारे जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर तंत्रज्ञान आपल्याकडे असणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासाठीच भारत सरकारने पुन्हा एकदा सुपरकॉम्प्युटर तंत्रज्ञान मिशन हाती घेतले आहे. 2020 पर्यंत तयार करण्यात येणारा जगातला हा सर्वांत शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर आपणास आपल्या भविष्यातील स्पेस संशोधन कार्यक्रमात हवामानाचे अचूक अंदाज वर्तविण्यात, भारतीय सैन्यदलाची सामरिक शक्ती वाढवण्यात, मिसाईल प्रोग्रॅम राबविण्यात, विविध संशोधनात, अर्थव्यवस्था मजबूत करण्यात उपयोगी पडणार आहे. थोडक्यात हा सुपर कॉम्प्युटर भारताला जागतिक महाशक्तीच्या आसनावर आरुढ करायला मदत करणार असल्याचे ते म्हणाले.

सुपर कॉम्प्युटर निर्मितीसाठी ऊर्जा व गुंतवणूक हेच खरे चॅलेंज

सुपर कॉम्प्युटरची निर्मिती आणि त्यासाठी सामोरे जावे लागणाऱया आव्हानाबाबत बोलताना डॉ. भटकर पुढे म्हणाले, सुपर कॉम्प्युटर निर्मिती मिशनसाठी करोडो रुपयांची गुंतवणूक करावी लागते. चीन आणि अमेरिका यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करीत आहेत. सर्वात त्रासदायक बाब म्हणजे सुपर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी ही सतत बदलणारी आहे. दहा वर्षांनी त्याच्या क्षमतेत तब्बल एक हजार पटीने वाढ होत असते. हा सुपर कॉम्प्युटर चालविण्यासाठी चार हजार मेगावॅट वीज लागायची. यापेक्षा अधिक क्षमतेच्या संगणकासाठी त्याहीपेक्षा अधिक विजेची गरज भासणार आहे आणि त्यामुळेच हे तंत्रज्ञान महागडे पडणारे असते. त्यामुळे  विजेचा वापर काही हजाराहून अवघ्या काही मेगावॅटवर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. 2020 मध्ये तयार होणारा सुपरकॉम्प्युटर अवघ्या 20 मेगावॅटमध्ये चालेल असा प्रयत्न आमचा आहे. भविष्यातील सुपरकॉम्प्युटर हे बायो एनर्जीवर चालणारे व अत्यंत छोटय़ा आकाराचेही असतील, असे सूतोवाच डॉ. भटकर यांनी केले.

सुपर कॉम्प्युटर निर्यात करण्याची क्षमता भारताकडे

हा सुपरकॉम्प्युटर बनविण्यासाठी सी-डॅक या प्रमुख संस्थेबरोबरच देशातील अनेक संस्था काम करीत आहेत. कामे विभागून घेऊन हे महाआव्हान पेलण्यासाठी शास्त्रज्ञ दिवस-रात्र झटत असल्याचे ते म्हणाले. या स्पर्धेत आपण व्यावसाईक म्हणून उतरू शकतो का, असे विचारले असता भटकर म्हणाले, निश्चितच आम्ही व्यावसायिक म्हणून या स्पर्धेत उतरू शकतो. तशी क्षमता आपल्या देशाकडे आहे. आपण ज्यावेळी पहिला सुपरकॉम्प्युटर बनवला होता, त्यावेळी तो अनेक देशांना निर्यातही केला होता. मात्र अशाप्रकारचे निर्यातक्षम उत्पादन तयार करायचे असल्यास या मिशनमध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. आपण अजूनही सुपरकॉम्प्युटरची चीप बनवू शकलेलो नाही. चीप बनवायची एक फाऊंडरी उभारायचे झाल्यास 24 हजार कोटी रुपये गुंतवावे लागतात. एवढी इन्व्हेस्टमेंट आपण जोपर्यंत करीत नाही, तोपर्यंत आपण या स्पर्धेत उतरू शकत नसल्याचे ते म्हणाले.

मानवी मेंदूची क्षमता कुणीही करू शकत नाही

मानवी बेन आणि सुपरकॉम्प्युटर यातील श्रेष्ठ कोण, असा प्रश्न भटकर यांना केला असता ते म्हणाले, मानवी मेंदूची बरोबरी कुठलाही सुपरकॉम्प्युटर करू शकत नाही. गणितीय क्षमतेच्या बाबतीत व विशिष्ट माहिती साठवणुकीच्या बाबतीत सुपरकॉम्प्युटर खूपच शक्तिशाली असतो. पण विविध प्रकारच्या क्षमतेबाबत विचार केला, तर शेकडो सुपर कॉम्प्युटरची एकत्रित क्षमता एका लहान मुलाच्याही मेंदूशी बरोबरी करू शकत नाही. मानवाच्या छोटय़ाशा मेंदूमध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचे ज्ञान साठलेले असते. या प्रचंड क्षमतेचा मेंदू चालविण्यासाठी नेमकी कोणती ऊर्जा कार्य करते, यावरही शास्त्रज्ञानी संशोधन सुरू केले असल्याचे डॉ. भटकर यांनी सांगितले.

मिशन 20-20 ची जबाबदारी डॉ. भटकरांकडेच

डॉ. विजय भटकर म्हणजे भारताला जगातील सुपरपॉवर देशांच्या पंक्तीत नेऊन बसवणाऱया डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. माशेलकर या थोर शास्त्रज्ञांच्या पंक्तीतील एका जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ. अमेरिकेने भारत टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपल्याशी स्पर्धा करू पाहतोय असा संशय येताच आपल्याकडील सुपरकॉम्प्युटर देण्याचे नाकारून अपमानीत केले. त्यावेळी स्वाभिमान दुखावलेल्या भारताच्यावतीने डॉ. विजय भटकर यांनी स्वतःहून सुपरकॉम्प्युटर निर्मितीचे आव्हान स्वीकारले आणि 2010 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली असा ‘परमकॉम्प्युटर’ तयार करून साऱया जगाला चकीत करून सोडले. त्यानंतर चीनने या सुपरकॉम्प्युटर निर्मितीत आघाडी घेऊन भारतासह अमेरिका, जपानला मागे टाकत जगात आघाडीचे स्थान मिळविले. आता भारताने या कॉम्प्युटर निर्मिती क्षेत्रात पुन्हा एकदा सुपर पॉवर बनण्याचा निर्धार केला असून त्यासाठी 2020 पर्यंत जगातील सर्वांत शक्तिशाली कॉम्प्युटर निर्मिती करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी मिशन 20-20 घोषणा केली असून त्याची जबाबदारी पुन्हा एकदा डॉ. विजय भटकरांकडेच सोपविण्यात आली आहे. यासाठी 4500 कोटीची गुंतवणूकही करण्यात आली आहे.