|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ज्येष्ठ समाजवादी नेते ज्ञानेश देऊलकर यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी नेते ज्ञानेश देऊलकर यांचे निधन 

मालवण : ज्येष्ठ समाजवादी, मच्छीमार नेते आणि थोर विचारवंत ज्ञानदेव साबाजी देऊलकर तथा ज्ञानेश देऊलकर सर यांचे मंगळवारी सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी येथील राहत्या घरी निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. आजारपणामुळे त्यांनी सक्रीय सामाजिक जीवनातून निवृत्ती घेतली होती. मच्छीमारांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी अखेरपर्यंत लढा दिला. त्यांनी एप्रिल 2014 मध्ये प्रसिद्ध केलेल्या आपल्या ‘मासा आणि माणूस’ या मच्छीमार व्यवसायाशी निगडित पुस्तक प्रकाशनप्रसंगी, ‘जिल्हय़ातील वाचक हे पुस्तक वाचून अंतर्मुख झाला तर मला ते माझे मोठे यश वाटेल. वाचकांनीच ठरवायचे आहे, मत्स्यजीवन वाचवायचे की मत्स्यजीवांच्या फोटोंचे भविष्यात फक्त म्युझियमच उभारायचे!’ अशी जळजळीत भावना व्यक्त केली होती.

देऊलकर सर यांच्यावर चिवला बीच वैकुंठधाम स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या सुकन्या चारुशिला देऊलकर यांनी भडाग्नी दिला. यावेळी उपस्थित मच्छीमार आणि नागरिकांचे डोळे पाणावले होते. ‘एका लढवय्या मच्छीमार नेत्याला सलाम’ अशीच प्रत्येकाची भावना होती. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नातू असा परिवार आहे.

ज्ञानेश देऊलकर यांचा जन्म मिर्याबांद येथे झाला. एमए बीएडपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी भंडारी हायस्कूल येथे शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग एकत्र जिल्हा असताना 1974 ते 88 या कालावधीत ते राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष होते. 1942 सालच्या ‘चले जाव आंदोलना’त स्वयंसेवक म्हणून त्यांनी सहभाग घेतला होता. 1968 ते आतापर्यंत श्रमिक मच्छीमारांचे संघटक म्हणून ते कार्यरत होते. मालवण तालुका श्रमिक मच्छीमार संघाची स्थापना व रजिस्टेशन 1987 साली त्यांनी केले. 1990 मध्ये त्यांनी मालवणच्या संघटनेला नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे संलग्न सभासदत्व मिळवून दिले. मच्छीमार संघाचे सलग 20 वर्षे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले. 1957 च्या बॅ. नाथ पैंच्या निवडणुकीत देऊलकर सरांनी सहभाग घेतला होता. सेवादल आणि समाजवादी विचारसरणीतूनच देऊलकर सर पुढे-पुढे गेले. नाथ पै यांच्यानंतर मधु दंडवते यांच्याही सोबत त्यांनी काम केले होते. विद्यार्थी उत्कर्ष मंडळ सर्जेकोट या संस्थेची स्थापना करून सलग 12 वर्षे कार्यवाह म्हणून ते कार्यरत राहिले. बॅ. नाथ पै सेवांगण या संस्थेची स्थापना 1980 साली करीत एक वर्ष अध्यक्ष आणि 19 वर्षे कार्यवाह म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. 1961 ते 66 मध्ये वादळग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. तसेच 1986 मध्ये गडनदीच्या पूरग्रस्तांनाही सहकार्य केले होते. 1980 मध्ये देवबाग बचाव आंदोलनाला चालना देत त्यांनी सहभाग घेतला होता. 1994 ते 98 मध्ये किनारपट्टीवरील भूमिपुत्रांच्या संरक्षण चळवळीत सहभागी होत, त्यांनी शासनाचे लक्ष वेधले होते. ‘तरुण भारत’मध्ये शैक्षणिक लेख, मच्छीमारांचे ज्वलंत प्रश्न, सागरी प्रदूषण, पर्यावरणाचा समतोल, हस्त व्यवसाय, हस्तउद्योग यावर लेखन केले होते.

मरीनपार्क प्रकल्प रोखून धरला

मरीनपार्क (सागरी अभयारण्य) हा प्रकल्प 1985 ते 98 या कालावधीत किनारपट्टीवर राबविण्यासाठी शासनाने अनेक प्रकारचे प्रयत्न केले होते. त्यामुळे किनारपट्टीवरील सुमारे दहा हजार मच्छीमार विस्थापित होण्याचा धोका ओळखून तसेच मत्स्य व्यवसायावर बंदी येण्याची शक्यता असल्याने त्यांनी मरीनपार्क विरोधात मच्छीमारांच्या चळवळीचे नेतृत्व केले. अभयारण्य प्रकल्पामध्ये स्थानिकांना संरक्षण देण्याची मागणी केली. मच्छीमारांच्या ताकदीने हा प्रकल्प रोखून धरला आहे. नॅशनल फिशवर्कस् फोरमच्या नऊ राज्यांतील प्रतिनिधींच्या कार्यशाळेत सहभागी होत मच्छीमारांचा हक्क सनद बनविण्यास देऊलकर सरांनी सहभाग घेतला होता. मालवण नगर परिषदेने 1968 मध्ये मासळीवर कर लादला होता. त्या विरोधात मच्छीमारांनी उठाव केला आणि अनपेक्षितरित्या तीन हजारांचा मोर्चा नगर परिषदेवर धडकला होता. लाकडाची मोळी, गवताची पेंडी व पालिकेने बसविलेला मासळीवरचा कर रद्द झाला. त्यासाठी सरांनी पुढाकार घेतला होता.

सरांना कष्टकऱयांविषयी कणव!

देऊलकर सरांच्या बालपणी वारकरी संप्रदायाचे संस्कार, भ्रातूल आजोबा वारकरी आणि प्रवचनकार, आईची स्वाभिमानाने राहण्याची शिकवण, आचार्य जावडेकर, नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी यांनी वैचारिक बैठक घडविली. सानेगुरुजी, गाडगे महाराज हे त्यांचे सामाजिक सेवेतील आदर्श राहिले.

समाजासाठी दीपस्तंभाची भूमिका बजावली!

आयुष्यभर कोणत्याही क्षेत्रात वावरताना आपल्याला जे-जे ठावे, ते-ते दुसऱयांस सांगावे, या भूमिकेतून आपल्या शिक्षकी पेशाशी प्रामाणिक राहत समाजाच्या विविध क्षेत्रात ज्यांनी दीपस्तंभाची भूमिका बजावली. तपस्वी मच्छीमार नेते, बॅ. नाथ पै सेवांगणचे संस्थापक व नाथ पै, दंडवते यांचे एकनिष्ठ सहकारी, ऋषितुल्य समाजवादी विचारवंत देऊलकर सर यांच्या निधनाने मालवणच्याच नव्हे, तर सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या अस्मानात तळपणारा धुव तारा आज निखळून पडला आहे.  विशेषतः श्रमिक मच्छीमारांना त्यांच्या न्याय्य हक्काची जाणीव करून देण्याबरोबरच त्यांच्यात समाजाप्रती असलेल्या जबाबदाऱयांचे भान निर्माण करीत त्यांनी या समाजाचे नेतृत्व केले. शिक्षक म्हणून विद्यार्थी घडविताना मालवणच्या व्यवसाय, उद्योग-क्षेत्रात तेजाने तळपणारे अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले. सेवांगणच्या जडणघडणीत सरांच्या योगदानाची तुलनाच करता येणार नाही. आज व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा पित्यासमान असलेला मार्गदर्शक हरपल्याची भावना माझ्या मनात आहे, अशा शब्दांत नितीन वाळके यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

मच्छीमारांच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत!

मच्छीमारांचे न्याय्य हक्क जागरुक करणारे आणि सातत्याने मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहून काम करण्याची प्रेरणा देणारे देऊलकर सर आमच्यासाठी प्रेरणादायीच होते. मच्छीमारांच्या प्रश्नांसाठी लढणारे अनेक कार्यकर्ते निर्माण करून मच्छीमारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सरांनी घेतलेली मेहनत नेहमीच चिरंतन राहील. जिल्हा शिवसेना देऊलकर सरांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, अशा शब्दांत आमदार वैभव नाईक यांनी श्रद्धांजली वाहिली.

सरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणार!

देऊलकर सरांनी सुरू केलेला शाश्वत मासेमारी आणि पांरपरिक मच्छीमारांचे हक्क यासाठीचा लढा यापुढेही सुरू ठेवणार असून सागरी जैवविविधतेचा शाश्वत वापर हे त्यांचे स्वप्न प्रबोधन आणि आंदोलनातून पूर्ण करणार, अशा शब्दांत नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे सदस्य रविकिरण तोरसकर यांनी श्रद्धांजली वाहिली.

अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले!

कष्टकरी आणि मच्छीमारांचे आधारस्तंभ असणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले आहे. हवामानातील फेरबदल, समुद्रातील अंतर्गत घडामोडी, पर्यावरणीय फेरबदलांचा देऊलकरांचा अभ्यास होता. त्यांच्या जाण्याने तपस्वी नेता हरपला, अशा शब्दांत लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी सरांना श्रद्धांजली वाहिली.

सागरीशात्राची प्रचंड माहिती असलेले व्यक्तिमत्व!

सागरीशास्त्राची प्रचंड माहिती असलेले ज्ञानी व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्ञानेश देऊलकर. त्यांना अपार सामाजिक भान होते. त्यांचे अनेक लेख आपण वर्तमानपत्रातून वाचले आहेत, असे शास्त्रज्ञ डॉ. विनय देखमुख यांनी सांगितले.

मच्छीमारांच्या हितासाठी लढण्याचे बळ दिले!

ज्ञानेश देऊलकर हे आमचे गुरुवर्य होते. त्यांनी मच्छीमारांच्या हितासाठी लढण्याचे बळ आम्हाला दिले. त्यांनी लढा उभारायचा कसा आणि यशस्वी व्हायचे कसे, याची शिकवण दिली. सरांनी घालून दिलेला आदर्श आम्ही पुढे नेऊ, अशा शब्दांत श्रमिक मच्छीमार संघाचे अध्यक्ष छोटू सावजी यांनी श्रद्धांजली वाहिली.

एका ज्ञानसूर्याची ‘एक्झिट!’

गेल्या अनेक पिढय़ांतील मच्छीमार समाजाला प्रगतीपथावर नेणाऱया एका ज्ञानसूर्याची एक्झिट आज या उपेक्षित समाजासाठी भरून न येणारी पोकळी आहे. देऊलकर सरांच्या जाण्याने आम्हासारख्या छोटय़ा मच्छीमार प्रतिनिधींचे गुरुवर्य गेल्याने आम्हाला त्यांची कायम उणीव जाणवणार आहे, अशा शब्दांत श्रमजिवी रापण संघाचे पदाधिकारी दिलीप घारे यांनी शोक व्यक्त केला.

सर्जेकोटवासीयांच्या सुखदुःखात शेवटपर्यंत सहभागी

सर्वसामान्य मच्छीमार सुखी व समाधानी व्हावा, याच उद्देशाने देऊलकर सरांनी सर्जेकोट येथील मच्छीमारांना एकत्र करून सर्जेकोट मच्छीमार सहकारी संस्था स्थापन केली. संस्थेतर्फे मच्छीमारांना विविध उद्योगांची ओळख करून दिली. देऊलकर सर शेवटपर्यंत गावाशी एकरुप राहिले. गावातील सुखदुःखात सहभागी होत होते. त्यांच्या जाण्याने सर्जेकोटवासीय एका मार्गदर्शकाला मुकला आहे, अशा शब्दांत सर्जेकोट पंचक्रोशी मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन गंगाराम आडकर यांनी श्रद्धांजली वाहिली.