|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » माकडताप नियंत्रणासाठी खास पथके

माकडताप नियंत्रणासाठी खास पथके 

बांदा : बांदा भागात माकडतापाची साथ आटोक्यात आणण्यासाठी पशूवैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच वनाधिकाऱयांची पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. पाटील यांच्या मदतीला कोल्हापूरचे डॉ. बल्लरोगी यांच्यासह पाच डॉक्टरांचे पथक, चार आरोग्यसेवक, तीन आरोग्यसेविका, एक तालुकास्तरीय पर्यवेक्षक व दोन जिल्हास्तरीय पर्यवेक्षक देण्यात आले आहेत. तसेच आजार आटोक्यात आणण्यासाठी गावागावात जनजागृती केली जात आहे.

 सध्या साधारण ताप असला तरी माकडतापाच्या भीतीमुळे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळच्या सत्रातील ओपीडीला मोठी गर्दी असते. येथे डॉ. पाटील, डॉ. प्रणाली कासार व कोल्हापूरचे डॉ. बल्लरोगी रुग्णांची तपासणी करतात. तर जिल्हास्तरीय पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. करतसकर, डॉ. संगमकर, डॉ. कुर्ले, डॉ. रुपेश जाधव तसेच चार आरोग्यसेवक व तीन आरोग्यसेविका सटमटवाडी जोखीमग्रस्त भागात रुग्णांची तपासणी करून औषधापचाराची माहिती देत आहेत.

 पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या आदेशानंतर सर्व यंत्रणा कार्यान्वित झाल्या. बांदा पशूवैद्यकीय अधिकाऱयांनीही पथकासह सर्व्हे हाती घेतला आहे. वनविभागानेही आपले काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. 45 जणांच्या पथकाने जोखीमग्रस्त भागातील मृत माकडांच्या विल्हेवाटीसाठी युद्धपातळीवर काम हाती घेतले आहे.

 बंदरविकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्लेटलेट मशिनची व्यवस्था बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात व्हावी, यासाठी प्रयत्न केला होता. ही मशिन दाखल झाली आहे. मशिनचे उद्घाटन एकनाथ नाडकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. बांदा सरपंच बाळा आकेरकर जातीनिशी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

 जनजागृती हाती

 बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राने जनजागृती मोहीमही हाती घेतली आहे. यासाठीच्या पथकात कोल्हापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बल्लरोगी, डॉ. प्रणाली कासार, आरोग्य सहाय्यक एच. एच. खान, वेटये, तुळसकर, पी. आर. चव्हाण यांचा समावेश करण्यात आला आहे. या पथकाच्या माध्यमातून बांदा आरोग्य केंद्राच्या अखत्यारितील बांदा पानवळ, निमजगा, गडगेवाडी, सटमट, इन्सुली कुडवटेंब, बिलेवाडी, शेर्ले, शेर्ले पानोसेवाडी, पंतोजीवाडी, कास, सातोसे, लिंगवाडी, नेतर्डे, डिंगणे, डिंगणे वरचीवाडी, बांबरवाडी, गाळेल या भागात स्लाईड शोच्या माध्यमातून
प्रबोधन करण्यात येत आहे.

         आणखी दोन माकडे मृत

 बुधवारी सटमटवाडी भागात दोन मृत माकडे सापडली. गाळेल व अन्य भागात माकडे मरून पडत आहेत. मृत माकडांच्या विल्हेवाटीचे मोठे आव्हान आता वनविभागासमोर उभे आहे. सध्या रुग्णसंख्या 38 वर पोहोचली आहे. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या चार रुग्ण उपचार घेत आहेत. तर बांबोळी-गोवा येथे सहाजणांवर उपचार सुरू असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. याबाबत बांदा वनरक्षक एस. एस. शिरगावकर यांना विचारले असता जोखीमग्रस्त भागात काम सुरू असल्याचे सांगितले.

Related posts: