|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दुचाकीस्वार संशयितांमुळे पोलीस यंत्रणा सतर्क

दुचाकीस्वार संशयितांमुळे पोलीस यंत्रणा सतर्क 

 

रत्नागिरी शहरात उलटसुलट चर्चा

नाकाबंदी करून शोध मोहिम

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरी शहर परिसरात दुचाकीवरून संशयास्पदरित्या फिरणाऱया दोन संशयितांमुळे गुरूवारी उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. त्याबाबत पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून या दोघांना ताब्यात घेण्यासाठी सायंकाळी शहरात नाकाबंदी करण्यात आली होती.

शहरात दोन संशयित दुचाकी (एमएच 42, एजे-1581)वरून फिरत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्याबाबत पोलिसांनाही खबर देण्यात आली. अंगात जॅकेट व कपाळावर टिळा लावलेले दोन इसम अनेक नागरिकांच्या निदर्शनास आले होते. त्या दोघांबाबत सोशल मिडीयावरून नागरिकांना खबरदारीचे आवाहनही करण्यात आले होते.

पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून त्या दोघांचा शोध शहर परिसरात सुरू होता. दरम्यान गुरूवारी सायंकाळी त्या दोघा संशयितांना ताब्यात घेण्यासाठी खबरदारी घेतली आहे. चोरी वा अन्य केणत्यातरी उद्देशाने हे संशयित फिरत असल्याचा संशय व्यक्त होत असून त्यासाठी पोलीसांनी शहरात नाकाबंदीही केली आहे.

सुट्टीच्या हंगामात अनेक नागरिक आपली घरे बंद करून बाहेरगावी जात असतात. हीच संधी हेरून चोरटे या काळात सोकावतात. त्यामुळे अशाप्रकारे कुणी संशयित आपल्या परिसरात फिरताना दिसून आल्यास नागरिकांनी खबरदारी घ्यावी व त्याबाबत पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.