|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जानवलीत भरदिवसा फ्लॅट फोडला

जानवलीत भरदिवसा फ्लॅट फोडला 

कणकवली : कणकवली शहरानजीक असलेल्या जानवली-डोंगरेवाडी येथील सावंत अपार्टमेंटमधील सुखराज हिमाजी सोलंकी (45, मूळ राजस्थान) यांचा फ्लॅट चोरटय़ांनी फोडला. आतील 50 हजाराची रोकड व एक लाख नऊ हजाराचे दागिने मिळून एक लाख 59 हजाराचा मुद्देमाल चोरटय़ाने लंपास केला. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. जेमतेम काही तासांसाठी बंद असलेला फ्लॅट चोरटय़ाने फोडल्यामुळे हा प्रकार माहीतगाराकडूनच झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलंकी हे जानवली-डोंगरेवाडी येथील सावंत अपार्टमेंटमधील तळमजल्यावरील रुम नं. 5 मध्ये पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासमवेत राहतात. त्यांचे परिसरात दुकान आहे. तर त्यांची पत्नी व मुलगी सध्या गावी गेली आहे.

                          दुपारच्या सुमारास चोरी उघडकीस

गुरुवारी सकाळी 8.30 च्या सुमारास सोलंकी यांचा मुलगा दुकानावर निघून गेला. त्यानंतर घरातील काही कामे आटोपून सोलंकी हेदेखील 9.30 च्या सुमारास फ्लॅटच्या मुख्य दरवाजाला बाहेरून कुलूप लावून बाहेर पडले. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ते घरी आले. त्यांनी मुख्य दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजाला आतून कडी लावली होती. सोलंकी यांना संशय आल्याने त्यांनी फ्लॅटच्या बाल्कनीच्या दिशेने धाव घेतली. पाहणी केली असता तेथील दरवाजा उघडा होता.

                           बेडरुममधील कपाटे फोडली

सोलंकी यांनी घरात जाऊन पाहणी केली. फ्लॅटच्या दोन्ही खोल्यांमध्ये असलेली कपाटे चोरटय़ांनी फोडली होती. आतील ड्रॉव्हर बाहेर काढले होते. दोन्ही कपाटांतील सामान चोरटय़ाने अस्ताव्यस्त केले होते. यातील एका कपाटामध्ये असलेली 50 हजाराची रोकड व एक लाख 9 हजाराचे सोन्याचे दागिने चोरटय़ांनी लंपास केले. यामध्ये 22 ग्रॅमची 46 हजाराची चेन, 15 ग्रॅमची 45 हजाराची कुडी, 6 ग्रॅमची 18 हजाराची अंगठी यांचा समावेश आहे.

                             पोलिसांकडून पंचनामा

या प्रकारामुळे घाबरलेल्या सोलंकी यांनी परिसरातील नागरिकांना माहिती दिली. पोलिसांनाही कल्पना देण्यात आली. सायंकाळच्या सुमारास कणकवली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर शिवगण, धनंजय चव्हाण, हवालदार ए. वाय. पोखरणकर आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते.

 चोरटय़ाचा बाल्कनीतून प्रवेश

सोलंकी यांच्या फ्लॅटच्या खोलीला बाल्कनी व खिडकी आहे. अज्ञात चोरटय़ाने बाल्कनीतून प्रवेश करत हत्याराचा वापर करत खोलीची आतील कडी उघडून आत प्रवेश केला. आतील कपाटे फोडून रोकड व दागिने लंपास करताना चोरटय़ाने फ्लॅटच्या मुख्य दरवाजाची कडी आतून लावून घेत तो पसार झाला, असेही पोलिसांनी सांगितले.

     चोरटा माहीतगार?

सोलंकी हे दररोज सकाळी आपल्या दुकानावर जातात व दुपारच्या सुमारास फ्लॅटवर येतात. गुरुवारीही ते नेहमीप्रमाणे दुकानावर गेले होते. नेमक्या 9.30 ते दुपारी 2 याच कालावधीत ही चोरी घडली आहे. सोलंकी यांची पत्नी, मुलगी बाहेरगावी असून सोलंकी व मुलगा दुकानावर असल्याने फ्लॅट काही तासांसाठी बंद असल्याची माहिती चोरटय़ाला होती. त्यामुळे चोरटा माहीतगार असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोलंकी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण करत आहेत.

                     कणकवलीला चोऱया, घरफोडय़ांनी ग्रासले

कणकवली शहर, परिसरासह तालुकाभरात वारंवार चोऱया, घरफोडय़ा होत आहेत. मात्र, घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यापलिकडे पोलीस काहीही करू शकलेले नाहीत. परिणामी ग्रामस्थांमध्येही घबराट पसरली आहे. अगदी काही मिनिटांसाठी घरे बंद करण्यास ग्रामस्थ घाबरत आहेत. मात्र, चोरटय़ांना जेरबंद करण्यात पोलिसांना अपयश येत आहे.

Related posts: