|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘अलविदा’ करताना दाटूनी आल्या भावना

‘अलविदा’ करताना दाटूनी आल्या भावना 

प्रतिनिधी/ कुडाळ

 पंचायत समितीच्या माध्यमातून काम करताना गेल्या पाच वर्षांत झालेल्या गरमागरम चर्चा, विविध विषयांवर अधिकाऱयांना धारेवर धरणे, तसेच अनेक विषयांवर झालेले एकमत या सर्वांना शुक्रवारी उजाळा देत झालेल्या चर्चेत कुडाळ पंचायत समितीची शेवटची बैठक काहीशी ‘इमोशनल’ झाली. सभागृहाला ‘अलविदा’ करताना सर्वच सदस्यांच्या भावना दाटून आल्या.

 तालुक्याचे मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या आणि तालुका विकासाचे केंदबिंदू असलेल्या कुडाळ पंचायत समितीच्या सभागृहात पाच वर्षे वावरलेल्या आणि तालुक्याचे विश्वस्त म्हणून काम केलेल्या सदस्यांचा कार्यकाल 14 मार्चला संपत आहे. या सदस्यांच्या कार्यकालातील शेवटची मासिक बैठक आज झाली. ती नेहमीची असली, तरी हा दिवस सभागृहाला ‘अलविदा’ करण्याचा असल्याने सर्व सदस्य काहीसे भावूक बनले होते.

  ही बैठक पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात सभापती प्रतिभा घावनळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसभापती आर. के. सावंत, गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांच्यासह सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 पं. स. सभापतीपद भूषविलेले, सतत तीनवेळा पंचायत समिती सभागृहात असलेले किशोर मर्गज वगळता अन्य सर्व सदस्य उपस्थित होते. आज काहीच काम करायचे नाही. आमची शेवटची बैठक आहे, असे काही सदस्य कर्मचाऱयांना सांगून आपल्या भावना व्यक्त करीत होते.

 आना भोगले यांनी वेताळबांबर्डे प्राथमिक शाळेच्या नावात वाडीच्या नावाचा उल्लेख आहे. तो काढून शाळेला क्रमांक दिल्यास जमीन मालक जमीन देतील, असे सांगितले. कुडाळ येथून सकाळी 8.30 वाजता ओरोसमार्गे कणकवली ही बसफेरी सुरू करावी, अशा मागण्या केल्या. नेरुर-कन्याशाळा इमारत दुरुस्त करण्याची मागणी दीपश्री नेरुरकर यांनी केली. पंचायत समितीची जुनी इमारत निर्लेखित करण्याची सूचना बबन बोभाटे यांनी केली.

 बैठकीचे कामकाज संपल्यानंतर पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत सामंत, प्रमोद ठाकुर, पं. स.चे सेवानिवृत्त सहाय्यक लेखाधिकारी जी. एस. साऊळ, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या अंगणवाडी सेविका शैलजा वळंजू यांचा सभापती-उपसभापती यांच्या हस्ते, गटविकास अधिकारी यांच्या हस्ते सभापती-उपसभापती यांचा प्रशासनातर्फे, तर प्रत्येक अधिकाऱयाच्या हस्ते सर्व सदस्यांचा सत्कार झाला. माजी सभापती शिल्पा घुर्ये यांचा सभापतींनी सत्कार केला. पक्षीय पादत्राणे बाहेर ठेवून आपण काम केले. सर्वांशी समन्वय ठेवूनच निर्णय घेतले. सर्वांचे चांगले सहकार्य लाभल्याचे घुर्ये यांनी सांगितले. सभागृहात काम करताना पक्षीय राजकारण कुठेच नव्हते. काम करताना सदस्यांचा त्रास झाला नसल्याचे व्ही. एम. नाईक यांनी सांगितले. त्यानंतर अधिकारी-कर्मचारी या सर्वांनी भावना व्यक्त केल्या.

 सदस्यांना भावना व्यक्त करताना गहिवरून येत होते. अधिकाऱयांच्या ओळखीने मतदारसंघात निधी आणून विकासकामे केली. पं. स. कुटुंब मानून काम केल्याचे आर. के. सावंत म्हणाले. अतुल बंगे म्हणाले, प्रारंभी आपण घुर्ये यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. अतिउत्साहाने त्या दुखावल्या गेल्या. पूजा पेडणेकर, तन्वी पवार व दीपश्री नेरुरकर याही भावनाविवश बनल्या. भोगले यांनी आपण या जि. प. निवडणुकीत पराभूत झालो, तरी पुढच्या निवडणुकीत वरच्या किंवा या सभागृहात असणार, असे सांगत लोकांसाठी काहीवेळा आंदोलने केल्याकडे लक्ष वेधले. बबन बोभाटे यांनी पहिली अडीच वर्षे उपसभापती, तर पुढील अडीच वर्षे राज्यातील सत्ताधारी म्हणून काम केल्याचे सांगितले.

Related posts: